कराड प्रतिनिधी । चोरी केलेली दुचाकी विकताना एकास अटक करण्यात कराड पोलिसांना यश आले आहे. कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने सापळा लावून अटक केली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सुनिल श्रीपती गावडे (वय 35) रा. येलुर ता. वाळवा जि.सांगली असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नारायनवाडी ता. कराड येथे एक इसम चोरीची दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो.हेड.कॉ.नितीन येळवे, पो.ना.सज्जन जगताप, सचिन निकम व पो.हेड.कॉ.उत्तम कोळी यांनी नारायणवाडी, पाचवड फाटा येथे सापळा लावला असता एक इसम गाडीवरुन आला त्यांचा संशय आल्याने ताब्यात घेतले.
त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले. महाराष्ट्र शासन वाहन पोर्टलवरुन माहिती घेतली असता सदरची मोटारसायकल ही पलुस पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरीस गेली असल्याचे समोर आले. पोलिसांनी गावडेला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलीस अधिक्षक समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हेड.कॉ.नितीन येळवे, उत्तम कोळी, पो.ना.,सज्जन जगताप, सचिन निकम यांनी ही कारवाई केली आहे.