कराड प्रतिनिधी । कराड शहरात सध्या प्लास्टिक पिशव्या वापरण्याचे व विक्रीचे प्रमाण वाढले असल्याचे लक्षात आल्याने कराड पालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कराड पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध भागात विशेष मोहीम राबवून रस्त्यावर तसेच हातगाडे, फिरते विक्रेत्या कडून बंदी असलेले प्लास्टिक वापरल्याने व उघड्यावर कचरा टाकल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या कारवाईत सुमारे साडेतीन किलो प्लास्टिक जप्त करून 900 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
कराड नगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर निदर्शनास आल्याने तीन व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या सूचनांचे पालन व्यवसायिक विक्रेत्यांनी करावे असे आवाहन करून ही मोहीम दररोज सुरू राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
कराड शहरातील बुधवार पेठ, फुले नगर ते शनिवार पेठ, राज मेडिकल परिसरात रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करणाऱ्या तसेच फिरत्या विक्रेत्यांना, भाजीपाला विक्रेत्यांनी वाहतुकीला अडथळा न होता रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्याच्या आत बसण्याबाबत त्या त्या भागातील पालिका मुकादम व कर्मचारी यांनी सूचना करून एकल वापर प्लास्टिक पिशवी वापरू नये अशा सुचना करून 75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या न वापरण्याबाबत व उघड्यावर कचरा न टाकण्याबाबत आवाहन करण्यात आले.
कराड शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे, स्वच्छ सर्वेक्षण अभियान समन्वयक आशिष रोकडे यांच्यासह वरिष्ठ मुकादम प्रमोद कांबळे व शहरातील प्रत्येक प्रभागातील मुकादम व आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.