कराड प्रतिनिधी | कराड येथील मार्केट यार्ड गेट क्रमांक एक ते बैलबाजार रस्ता शहराच्या हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्या रस्त्याच्या दुरवस्थेवरून आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी पालिकेला दिला होता. त्याची दखल घेत पालिकेने नुकतीच तात्पुरत्या स्वरूपात डांबरी पॅचिंगला सुरुवात केली. लवकरच सर्व रस्त्यावरील दुरुस्ती करण्यात येणार आहे.
कराड शहरातून महामार्गाला जोडणाऱ्या पर्यायी व महत्त्वाच्या बैलबाजार रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती किंवा तेथे नवा रस्ता करण्याच्या मागणीकडे पालिका प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत होते, तसेच काही महिन्यांपूर्वी दुरुस्त केलेला रस्ता अवघ्या काही महिन्यांत पुन्हा खराब झाल्याने दयनीय स्थिती झाली होती. त्यामुळे तो रस्ता त्वरित करावा, अन्यथा त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्या भागातील स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला दिला होता.
भेदा चौक ते पालिकेच्या हद्दीपर्यंत तब्बल ४० हून अधिक खड्डे पडले आहेत, तर मार्केट यार्ड एक नंबर गेट ते बैलबाजार रोड कऱ्हाड शहर हद्दीपर्यंत असणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, नागरिकांना खूप त्रास होत आहे, तसेच स्थानिक नागरिकांना देखील धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. रस्ता खराब असल्यामुळे छोटे-मोठे अपघातही होत असल्याने नागरिकांनी नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा दिला होता. नगरपालिकेने त्याची दखल घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.