कराड प्रतिनिधी । येत्या काही दिवसात पावसाळ्यास सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात सर्वात महत्वाचा विषय हा दूषित पाण्याचा असतो. कारण या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार होतात. या आजारापासून कराडकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कराड शहरात पालिकेने पावसाळा पूर्व उपाययोजनांची कामे हाती घेतली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कराड पालिकेडून उद्या शनिवारी जल शुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या निवळण टाकीची स्वच्छता केली जाणार आहे. परिणामी शहरात उद्या सायंकाळी पाणी पुरवठा होणार नसून रविवार दि. 18 रोजी सकाळचा होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे, असे महत्वाचे आवाहन करत असल्याचे कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना केले.
कराड शहरात पालिकांकडून पाण्याच्या टाक्या, नालेसफाईची कामे हात घेण्यात आलेली आहे. नाले सफाई व टाकीच्या स्वच्छतेच्या कामामुळे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा हा काही वेळ बंद ठेवला जात आहे. पालिकेने शनिवार आणि रविवार या दोन दिवसात शहराला ज्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवथा केला जातो त्या टाकींची स्वच्छता करण्याचे कां पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. पाणी पुरवठ्याबाबत पालिकेने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
या निवेदनात म्हंटले आहे की, कराड शहरात उद्या शनिवारी दि. 17 रोजी जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी निवळण टाकीची स्वच्छता केली जाणार आहे. त्यामुळे उद्या शनिवारी शहराचा पाणी पुरवठा बंद राहील, तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. कराड पालिकेकडून शहरातील पाणी निवळण टाकीमधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठ्याबाबत काही बदल करण्यात आले आहेत. नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करत असल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.