कराड प्रतिनिधी । उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पाटण दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमनातरी शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर असून पाटणला येत असल्याने यावेळी त्यांनी पाच मिनिटे वेळ द्यावा, अशी विनंती करणारे पत्र कराड तालुका सकल मराठा बांधवांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री म्हणून मोठी भूमिका बजावून 27 जानेवारी रोजी अध्यादेश काढला. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण दिलेले योगदान खुप मोठे आहे. त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुका आपल्या जन्मभूमीत आपला सत्कार करणार आहे. सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार सत्कारासाठी आपण पाच मिनिटे आपला वेळ द्यावा, अशी विनंती सकल मराठा बांधवांनी पत्राद्वारे केली आहे.
मरळीत आगमन होताच मराठा बांधव मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पत्र देऊन वेळ घेणार आहेत. विवाह समारंभानंतर मुख्यमंत्री मोटारीने कोल्हापूरला जाणार आहेत. त्यावेळी वारूंजी फाटा (पाटण तिकाटणे) येथे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचे नियोजन मराठा बांधवांनी केले आहे. सत्कारासाठी मुख्यमंत्री नक्की वेळ देतील, असा विश्वास कराड तालुका क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केला आहे.