कराड प्रतिनिधी । कराड जनता सहकारी बँकेच्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर काढलेल्या 4 कोटी 62 लाख 87 हजारांच्या कर्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील- वाठारकर याच्यांसह 27 जणांसह बँकेचे अवसायानिकांच्या चौकशी करण्याचे आदेश कराड येथील फौजदारी न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी नुकतेच दिले आहेत. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागितलेली परवानगी नाकारत उलट गंभीर प्रकार आढळून येत आल्याने त्याचाही गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या. भागवत यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड जनता सहकारी बँकेने 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर ४ कोटी ८७ लाखांची कर्ज प्रकरणे केली होती. त्यावर आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या वसुलीवर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. बँकेने कर्मचाऱ्यांना वाटलेली कर्ज संशयास्पद आहेत, त्याची चौकशी करा, अशी मागणी 296 कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र, अवसायिकांनी त्यांची वसुली कायम ठेवली होती. अखेर कर्मचाऱ्यांनी त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. तसेच देण्यात आलेली कर्जे हि बोगस असल्याचा असा दावा न्यायालयात दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाकडून संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते.
त्यानंतर कराड शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या प्रकरणी सखोल पद्धतीने तपास केला. यादरम्यान, ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी आरोप केले होते ते फेटाळण्यात आले होते. तसेच या प्रकारणी संबंधित दोषींवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी, असा अहवाल त्यांनी न्यायालयात दिला होता. न्यायालयात दाखल केलेल्या अहवालावर आक्षेप घेत कर्मचाऱ्यांनी पुन्हा अपील दाखल केले. त्यात कर्मचाऱ्यांतर्फे अॅड. पी. आर. लोमटे, अॅड. अमोल खोंडे यांनी काम पाहिले. न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या कर्ज प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला अहवाल चुकीचा आहे, असा युक्तीवाद वकिलाच्या वतीने करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तो ग्राह्य धरत 296 कर्मचाऱ्यांच्या कर्ज प्रकरणात झालेल्या गंभीर प्रकाराची दखल घेतली.
पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागितलेली परवानगी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्याउलट गंभीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी, संचालक विकास धुमाळ, राजीव शहा, सुरेश लाहोटी, दिलीप चव्हाण, आकाराम शिंगण, दिनकर पाटील, शंकरराव काटे, प्रकाश तवटे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, रमेश गायकवाड, डॉ परेश पाटील, संजय घोक्षे, राजेंद्र पाटोळे, प्रतिभा पाटील, ज्योती शहा, अनिल ज्यादव, संजय जाधव, विजयकुमार डुबल, दीपक पाटणकर, बाजीराव पाटील, अरुण पाटील आणि भाऊसाहेब थोरात या 27 जणांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.