हजारमाचीतील सोमनाथ सुर्यवंशी टोळीला मोक्का, आणखी टोळ्या पोलिसांच्या रडारवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीला मोठा दणका दिला आहे. कराड तालुक्यातील हजारमाची येथील सोमा उर्फ सोमनाथ उर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी, रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे आणि आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यावरील मोक्कांतर्गत दोषारोपपत्राला अप्पर पोलीस महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. सोमनाथ सुर्यवंशी याच्यावर यापुर्वी कराड शहर तसेच पुणे येथे वैयक्तिक व टोळीने केलेले १३ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती अमोल ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

समीर शेख यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक मोठ्या गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कराड शहर आणि परिसरातील अनेक गुन्हेगार पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यापैकीच सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशीची टोळी होती. मोक्कांतर्गत दोषारोपपत्राला मंजुरी मिळताच या टोळीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी सांगितले. या टोळीवर एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी, जुगार, अपहरण, सरकारी नोकरांवर हल्ले व अवैध अग्निशस्त्र बाळगल्याच्या गुन्हयांचा समावेश आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षकांची परवानगी मिळाल्यानंतर डीवाएसपी अमोल ठाकुर यांनी सखोल तपास करुन आरोपींविरुध्द मोक्कांतर्गत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याची पुर्व परवानगी मिळण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला दि. १० जून रोजी मंजुरी प्राप्त झाली. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

कराड शहर व परिसरातील आणखी काही कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. हिंसक व गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून या पुढील काळात देखील अशाच कठोर कारवाया केल्या जाणार असल्याचा इशारा डीवायएसपी अमोल ठाकूर, कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिला आहे.

तपास अधिकारी तथा डीवायएसपी अमोल ठाकुर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, अमित बाबर, उपनिरीक्षक अनिल पाटील तसेच पोलीस अंमलदार असिफ जमादार, अनिकेत पवार, संजय देवकुळे, संतोष सपाटे, महेश लावंड प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, अमित सपकाळ, सागर बर्गे, दिपक कोळी, आनंदा जाधव, धीरज कोरडे, सोनाली पिसाळ यांनी मोक्का प्रस्तावासाठी परिश्रम घेतले.