कराड प्रतिनिधी । कराड येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्यावतीने काल एकास सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली. संतोष शिवाजी बागल (वय 26, रा. मलकापूर, ता. कराड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील मलकापूर येथील संतोष बागल याचा विवाह झाला असतानाही त्याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले होते. त्यानंतर त्याने शिर्डी व शनी शिंगणापूर येथील लॉजवर नेऊन संबंधित मुलीवर अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास भावाला ठार मारेन आणि बहिणीचे अपहरण करेन, अशी धमकी दिली होती. यानंतर कराड येथे परत आल्यानंतर संबंधित पिडीत मुलीने कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिने दिलेल्या फिर्यादीवरुन कराड तालुका पोलीस ठाण्यात संतोष बागल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालिन पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर व उपनिरीक्षक भापकर यांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद तसेच सादर केलेले पुरावे ग्राह्य धरण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने आरोपी संतोष बागल याला 10 वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आणि ३ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. दरम्यान, दंडाच्या रक्कमेतून पिडीत मुलीला २५ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने केला आहे. सरकार पक्षाला अॅड. ऐश्वर्या यादव, अॅड. कोमल लाड यांनी सहकार्य केले.