कराड प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व 1.5 लाख रुपये दंडाची शिक्षा काल सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी शिक्षा सुनावली आहे. रोहन दत्तात्रय शेटे (रा. चंदुररोड, इचलकरंजी), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी रोहन दत्तात्रय शेटे याने पीडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्याशी जवळीक साधली. यातील पिडीत मुलगी ही तिची आई व तीच्या आईचे दुसरे विवाह झाल्या नंतरही आरोपी रोहन शेटे याने त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत कोविड काळात त्यांचे भाड्याचे घर गेल्याने ते अम्बॅसिडर गाडीत राहत असताना गैरफायदा घेवून पीडीतेवर लैंगिक अत्याचार केला. यामध्ये ती गरोदर राहिली. तिला दि. १९/०२/२०२० रोजी पोटदुखीचा त्रासामुळे तिचेवर वैद्यकीय उपचार करतेवेळी व सोनाग्राफी रिपोर्टमुळे ती १८ आठवडे गरोदर राहिल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपीने तिच्या अज्ञानतेचा गैरफायदा घेतल्याने सदरचा गुन्हा केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले.
याकामी वैद्यकीय अधिकारी, तासगांव नगरपंचायतीचे जन्म मृत्यू नोंदीचे तपास व डीएनए अहवाल तंतोतंत जुळल्याने आरोपीचा बचाव मे. कोर्टाने फेटाळला. सरकारी वकील आर. सी. शहा यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपीस २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. तपासी अधिकारी एस. व्ही. खाडे, पीडित मुलगी, फिर्यादी, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून १ लाख रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.