कराड प्रतिनिधी | कराड शहरात रविवारी कराड शहर वाहतूक शाखा पोलीसांच्या वतीने अतिक्रमणाची धडक कारवाई करण्यात आली. यावेळी शहरातील बाजारपेठेसह दत्त चौक ते चावडी चौक, बसस्थानक परिसर या भागात अनेक व्यावसायिकांनी दुकानांच्या जाहिरातीचे अवाढव्य असे उभे केलेले फलक पोलिसांनी संपूर्ण शहरात पाहणी करून हटविले.
सणासुदीचा काळ असून शहरात दत्त चौक ते चावडी चौक, चावडी चौक ते मंगळवार पेठ, बसस्थानक परिसरात फुटपाथवर, कृष्णा नाका परिसर, मंडई भागात प्रचंड वर्दळ आहे. खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत असून पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे. यातच अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर लोखंडी स्टॅण्डला डिजिटल फलक लावून दुकानाच्या जाहिराती केल्या आहेत.
अवास्तव आकाराच्या फलकांमुळे वाहतुकीला अडथळा होऊन अनेक दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत होते. हा प्रकार लक्षात आल्यावर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर पायी चालत पाहणी केली. तसेच शनिवार व रविवारी त्यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने ज्या व्यावसायिकांनी अवास्तव आकाराचे फलक रस्त्यावर लावले आहेत ते काढण्याच्या सूचना केल्या.
व्यावसायिकांनीही पोलिसांच्या सूचनेला प्रतिसाद दिला. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे फलक यापुढे उभा करू नये. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी यावेळी दिला.