कराड प्रतिनिधी । दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला संशयित त्याच्या गावात आला असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डीबी) पथकाला कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिसांनी जखिणवाडी गावात सापळा रचून पृथ्वीराज बळवंत येडगे (वय, २९) याला पकडले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार संशयितांची माहिती काढुन ते हद्दीत आले असल्यास तात्काळ कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकुर यांनी आदेशित केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी उपनिरीक्षक पंतग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पो. कॉ. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांच्या विशेष पथकाची नेमणूक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला पृथ्वीराज बळवंत येडगे हा जखिणवाडीतील बिरोबा मंदिराच्या ठिकाणी आला आहे. ही माहिती उपनिरीक्षक पतंग पाटील व त्यांच्या पथकास कळवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार जखिणवाडीतील बिरोबा मंदिराच्या परिसरात सापळा रचून तडीपार इसम पृथ्वीराज बळवंत येडगे यास पोलिसांनी पकडले. तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार अमित पवार आणि डीबी पथक पुढील तपास करीत आहेत.