कराड प्रतिनिधी । खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाचीही वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रशासनाला मागील वर्षी मे महिन्यात दिले होते. त्यानुसार एसटी महामंडळाने राज्यातील ५८० एसटी बस स्थानक स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता अभियानाची मोहीम हाती घेत “हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानातील तिसरे सर्वेक्षणात महाराष्ट्रातील २५० आगारातील अ वर्गातील १४७ बसस्थानकापैकी कराड बसस्थानकाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कराड बसस्थानकाची पाहणी केली होती. यावेळी समितीने कराड बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, प्रवासी आरक्षण कक्ष, पुरुष व महिला स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांती गृह, आरक्षण खिडकी, पास विभाग चौकशी खिडकीची पाहणी केली.
तसेच तेथील कर्मचाऱ्यांना अधिक सूचना देखील केल्या. तसेच विविध रजिस्टर व फाईलची पाडताळणी केली होती. त्यानुसार बसस्थानकात येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कराड बस स्थानकात आकर्षक रंगरंगोटी आणि सेल्फी पॉईंटसह अनेक सुधारणा देखील केल्या.
प्रवाशी अन् कर्मचाऱ्यांमुळे बसस्थानकाचा राज्यात क्रमांक : शर्मिष्ठा पोळ
आज मिळवलेल्या यशाचे सर्व श्रेय आगारातील चालक- वाहक, कार्यशाळा कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांचेच आहे. सर्वांनी अथक परिश्रम करून आपल्या कराड आगाराचे महाराष्ट्रात नावलौकिक केलेबद्दल आपले सर्वांचे त्रिवार अभिनंदन करत आहे. तसेच यापुढेही असेच एकजुटीने प्रयत्न करून चौथ्या सर्वेक्षणातही महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवूयात असा विश्वास कराड आगाराच्या व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केला.
अशी होती स्पर्धेची वर्गवारी
स्वच्छ, सुंदर बस स्थानकांची स्पर्धा ही शहरी विभाग- अ वर्ग, निम शहरी विभाग- ब वर्ग, ग्रामीण विभाग-क वर्ग या तीन विभागातील बस स्थानकात घेण्यात आली आहे. ही स्पर्धा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर, अमरावती अशा सहा प्रादेशिक विभागात पार पडली. त्यामध्ये शहरातील मुख्य बस स्थानक, तालुका बस स्थानक व ग्रामीण भागातील गावागावांतील बस स्थानकांची स्वच्छता व सुशोभीकरण याचा समावेश करण्यात आला होता.