कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील वारुंजी, मुंढे, गोटे, केसे, पाडळी या भागातील ग्रामस्थांनी विमानतळ विस्तारीकरणाला विरोध दर्शविला आहे. मात्र, विकासाचे काम करताना स्थानिक घटकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकार नेहमीच घेत असते. त्यामुळे कराड येथील विमानतळ विस्तारीकरण विरोधातील ग्रामस्थांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे आश्वासन भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी विमानतळ विस्तारीकरण विरोधी कृती समिती सदस्य व ग्रामस्थांना दिली.
कराड येथील विमानतळाचा विस्तार करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले असून, त्यासाठी भरघोस निधीचीही तरतूद सरकारने केली आहे. मात्र, या विस्तारीकरणाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याप्रश्नी विस्तारीकरणामुळे बाधित होणाऱ्या वारुंजी, मुंढे, गोटे, केसे, पाडळी या गावातील ग्रामस्थांनी विमानतळ विस्तारीकरणविरोधी समितीच्या माध्यमातून भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी विरोधाच्या भूमिकेबद्दल सविस्तर मांडणी केली.
यावेळी डॉ. भोसले म्हणाले, विमानतळ विस्तारीकरणाबाबत लोकांच्या भावना तीव्र असून, मी लोकभावनेसोबत आहे. विकासाचे काम उभा करताना कुणावरही अन्याय होणार नाही याची विशेष काळजी राज्य सरकार घेत आले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ ही भारतीय जनता पार्टीची भूमिका असून, त्याचे तंतोतंत पालन पक्षातील सर्व घटकांकडून आणि राज्य सरकारकडूनही केले जाते. त्यामुळे स्थानिकांचा विरोध डावलून कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही, अशी ग्वाही देतानाच याप्रश्नी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची भेट लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी घडवून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुंढे गावचे माजी सरपंच आनंदराव जमाले, रमेश लवटे, प्रमोद पाटील, सिद्धेश्वर पाटील, चंद्रकांत पाटील, हरिश्चंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, हणमंत पाटील, विनायक शिंदे, शिवाजीराव शिंदे, महेश शिंदे, प्रशांत पाटील, भास्करराव धुमाळ, आत्माराम पाटील, दादासो पाटील, संतोष पाटील, रामभाऊ पाटील, पंजाबराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.