कराड प्रतिनिधी । कराडसह परिसरातील तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी आपला शेतीचा भाजीपाल्यासह इतर माल विक्रीसाठी कराड येथील स्वा. सै.शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये घेऊन येतात. या ठिकाणी मालाच्या लिलावाच्या वेळेबाबत शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होत असलेल्या मागणीनुसार एक वेळ व खुली लिलाव पद्धत सुरू करण्याचा शुभारंभ आज शुक्रवारी करण्यात आला.
शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती संभाजी चव्हाण,संचालक नितीन ढापरे,गणपत पाटील,जे.बी. लावंड,मनुभाई पटेल,रयत संघटनेचे प्रा.धनाजी काटकर,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते,इफ्कोचे सदस्य हणमंतराव चव्हाण, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील,संचालक अजित पाटील, काँग्रेसचे कराड दक्षिण उपाध्यक्ष नितीन थोरात,सचिव आबा पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यापूर्वी सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा सुरू रहात होते.दोन वेळच्या लीलावामुळे शेतकरी व व्यापारी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने बाजार समितीकडे शेती मालाचा लिलाव दिवसातून एक वेळ संध्याकाळी खुल्या पद्धतीने भरवावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत होती. त्यानुसार शुक्रवार दि.16 पासून एक वेळ मार्केट आणि खुल्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला आहे. आता शेतीमाल लिलाव दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार असून झालेल्या बदलाची नोंद शेतकरी,आडते,व्यापारी,वाहनधारक यांनी घ्यावी असे आवाहन शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रकाश पाटील यांचा पहिला व महत्वाचा निर्णय
कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापतीपदी निवड झाल्यानंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे नवनिर्वाचित सभापती प्रकाश पाटील यांनी म्हंटले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पहिला आणि महत्वाचा निर्णय आज घेतला आहे.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला : सभापती प्रकाश पाटील
कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर आज पहिला आणि सर्वांच्या हिताचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून घेतला आहे. अजून अनेक निर्णय शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या हिताच्या दृष्टीने घेतले जातील. आज घेतलेल्या निर्णयाचा फायदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया सभापती प्रकाश पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.