कापील गावच्या लोकनियुक्त सरपंच अपात्र; पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कापील गावच्या  लोकनियुक्त सरपंच कल्पना तानाजी गायकवाड यांना अपात्र करण्यात आले आहे. सरपंचांनी पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायतीची 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेतील मीटर सर्वांना एकाच दराने वाटप केली नसल्याची तक्रार तक्रारदार गणेश पवार यांनी केली होती. त्यानंतर सरपंच कल्पना तानाजी गायकवाड यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

याबाबत तक्रारदार गणेश पवार यांनी हॅलो महाराष्ट्र शी बोलताना सांगितले की त्यांनी विद्यमान सरपंच यांनी ग्रामपंचायतीमध्ये पदाचा गैरवापर केल्याने कारवाईची मागणी केली होती. ग्रामपंचायतीची 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेतील मीटर सर्वांना एकाच दराने वाटप केले नसल्याचे गणेश पवार यांनी तक्रार केली होती. या तक्रारी नंतर त्यांनी नळपाणी योजनेतील गैरव्यवहाराची चाैकशी करण्याची मागणी केली होती. सरपंचांनी 67 पाणी मीटर ग्रामपंचायतीच्या मान्यतेशिवाय पुरवठा दाराकडून स्वतः कडे ताब्यात घेतल्याचे दिसून आले असून जिल्हा परिषद सातारा यांनी दिलेल्या अहवालावरून सरपंच यांनी अधिकारांचे उल्लघंन केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे आता उर्वरित कालावधीसाठी कापील गावच्या सरपंच कल्पना गायकवाड यांना पदावरून हटविण्यात आले आहे.

दरम्यान, कापील ग्रामपंचायतीने 24 बाय 7 ही पाणी योजना लोकांच्या हितासाठी राबवली होती. परंतु, सरपंचांनी पदाचा गैरवापर करून या योजनेपासून गोरगरीबांना त्रास दिला. सरपं चाच्या या चुकीच्या भूमिकेमुळे लोकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. आता उर्वरित लोकांना पाणी व पाणी मीटर द्यायचे असून ज्या लोकांना मीटरबाबत आर्थिक भुर्दंड बसला. त्यांनाही न्याय मिळवून द्यायचा आहे, असे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणेश पवार यांनी सांगितले.

कापील मध्ये सत्ता कोणाची?

2019 साली पार पडलेल्या कापील ग्रामपंचयात निवडणूकीत भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांच्या पॅनेलच्या विरोधात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढलेली होती. त्यावेळी भाजपचे 5 तर काॅंग्रेस व राष्ट्रवादीचे 6 सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच असे 7 जण निवडूण आले होते. आजच्या सरंपच अपात्रतेच्या निकालामुळे काॅंग्रेस व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.