ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलाबाई आंबेकर यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभाग असलेल्या व प्रतिसरकारचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ज्यांना बहीण मानले होते. अशा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलाबाई वसंतराव आंबेकर (९६) यांचे आज सकाळी साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

त्यांचे पार्थिव दुपारी चार वाजेपर्यंत सातारा येथील पोवई नाका येथील रविवार पेठेतील आंबेकर निवास येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता अंत्ययात्रा निघेल. ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर यांच्या त्या मातोश्री असून पत्रकार सुजित आंबेकर यांच्या त्या आजी होत्या. श्रीमती कमलाबाई आंबेकर यांच्या मागे चार विवाहित मुले, चार विवाहित मुली, सुना , जावई, नातवंडे, नात सुना असा परिवार आहे.

श्रीमती कमलाबाई आंबेकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील हे भूमिगत असताना तसेच इतरही स्वातंत्र्यसैनिक भूमिगत असताना त्यांच्या राहण्याची सोय व जेवणाची सोय पोवई नाक्यावरील आंबेकर निवास येथे केली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक या घरात व तळघरात राहून गेलेल्याची आठवण श्रीमती कमलाबाई आंबेकर नेहमी सांगत असत. कर्मवीर भाऊराव पाटील, स्वातंत्र्यसैनिक रावसाहेब कळके, कॉम्रेड शेख काका उर्फ शेख बंडू इनामदार, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी डी बापू लाड, क्रांतिवीर कॉम्रेड बाबूजी पाटणकर,

क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर, राजमती पाटील, तुफान सेनेचे कॅप्टन राम लाड, कॉम्रेड व्ही. एन. पाटील, रामजी पाटील, दत्तोबा वाकळे, कॉम्रेड नारायणराव माने, सोपानराव घोरपडे, बाबुराव जंगम असे अनेक क्रांतिकारक व बिळाशी येथील सत्याग्रहात भाग घेतलेले अनेक क्रांतिवीर आंबेकरांच्या निवासस्थानी येत असत. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास व संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास अनुभवलेल्या श्रीमती कमलाबाई आंबेकर यांच्या निधनाने त्या काळचा शेवटचा दुवा हरपला आहे.