हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या युवकाचा विहिरीत घसरून पाय पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रविराज दिलीप काळे (वय 30, रा. काळगाव, ता. पाटण) असे युवकाचे नाव आहे. युवकाच्या मृत्यूमुळे काळगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ढेबेवाडी विभागातील काळगावमध्ये राहत असलेल्या 30 वर्षीय रविराज काळे हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. शनिवारी, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तो आंबे उतरवण्यासाठी झेलणे आणण्यासाठी गावालगतच असलेल्या शिवारातील विहिरी जवळच्या शेडकडे गेला. खूप वेळ झाला तरी संबंधित युवक परत आला नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला. तर काही जण विहिरीकडे पाहण्यासाठी गेले असता विहिरीमध्ये एक झेलने तरंगत असल्याचे त्यांना दिसून आले. युवकांनी विहिरीत उतरून पाण्यामध्ये रविराजचा शोध घेतल्यावर तो पाण्यात पडल्याचे आढळून आले. तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्याला गंभीर दुखापतही झालेली होती. युवक, ग्रामस्थ व नातेवाइकांनी रविराजला तात्काळ कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रात्री उशिरा काळगाव येथे रविराजच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविराजने M.Sc पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून, सध्या तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. हुशार, मनमिळाऊ रविराजचा काळगाव व परिसरात मित्र परिवार आहे. गावातील सार्वजनिक गणेश मंडळ व गोल्डन ग्रुपमध्ये तो सक्रिय होता. त्याच्या पश्चात आई-वडील, चुलते- चुलती बहिणी असा परिवार आहे. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत शेवाळे तपास करत आहेत.