सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रसह आंध्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेस कालपासून प्रारंभ झाला. आज पौष पौर्णिमेला यात्रेचा मुख्य दिवस असून यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते व ट्रस्टचे अध्यक्ष व अतिरिक्त जिल्हा न्या. एस. जी. नंदीमठ, प्रशासकीय विश्वस्त प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सोनाली मेटकरी, वाईचे पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, विश्वस्त यांच्या उपस्थितीत देवीची मुख्य पूजा करण्यात आली.
यात्रेसाठी मांढरगडावर भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. यात्रेच्या अनुषंगाने गडावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आज सकाळपासून प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, गटविकास अधिकारी, तसेच पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, सचिन चव्हाण आदींनी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. रात्री देवीचा जागर झाला. या जागराला देवीची मानाची पालखी गावातून वाजत- गाजत मंदिराकडे आणण्यात आली.
दरम्यान, आज शाकंभरी पौर्णिमेला पहाटे सहा वाजता देवीची मुख्य पूजा बांधण्यात आली. यात्रेनिमित्ताने येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी देवस्थान ट्रस्टने मुख, कळस व चरण दर्शन, तसेच देव्हारे व छबिना यासाठी बॅरिकेटसच्या माध्यमातून स्वतंत्र रांगांची सोय केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराकडे जाणाऱ्या चढणी व उतरणीसाठी नवीन पायऱ्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये गार्डनिंग करण्यात आले आहे.