सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील ऐतिहासिक सातारा भागात असलेल्या ऐतिहासिक खंडोबा मंदिराचा पुरातत्व विभागाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून जीर्णोद्धार केला जात आहे. दरम्यान, सातारा गावाच्या अंतर्गत ९ किलोमीटर अंतरावरील कडेपठार खंडोबा मंदिर देवस्थानास “क” वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेतून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विशेष म्हणजे यासाठी पश्चिम मतदार संघाचे आ. संजय शिरसाट यांनी जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी या देवस्थानास ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा बहाल केला आहे.
नेमकी काय केली होती मागणी?
खंडोबाचे मूळस्थान कडेपठार आहे. मात्र, तेथील जीर्ण अवस्थेत मंदिर असून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. येथे खंडोबा, म्हाळसा, बानू यांची शिळा आहे. तसेच चारही बाजूंनी दगडी शिळाचे बांधकाम आहे. पण, मंदिराची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. सालाबादप्रमाणे यात्रेनिमित्त खंडोबा मंदिरापासून ते कडेपठारपर्यंत पालखी काढली जाते. तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, वीज पाण्याची सोय नाही. यामुळे सरकारने कडेपठार खंडोबा मंदिर देवस्थानास “क” वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास निधी द्यावा, अशी पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली होती.
अशी होणार कामे
मागणी पूर्ण झाल्याने सोलापूर – धुळे महामार्गापासून सातारा तांडा ते कडेपठारपर्यंत डोंगरकपारीतून जाणाऱ्या ९ किलोमीटरच्या कच्च्या रस्त्याचे नशीब उजळणार आहे. यात पहिल्या टप्प्यात दीड किलोमीटर रस्त्यासाठी बांधकाम विभागाने एक कोटी रुपये मंजूर केले असून रस्ते कामाची वर्क ऑर्डर राजेंद्र वरकड यांना देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी रुपये देखील मंजूर झाले असून सोलापूर धुळे महामार्गापासून ते सातारा तांडा ते कडेपठारपर्यंत रस्ता गुळगुळीत केला जाणार आहे.