सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुलांच्या हंगामाची सुरुवात ३ सप्टेंबरपासून होणार आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं होणार आहे. मात्र, तत्पूर्वी कास पठारावर अनेक आकर्षक नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास सुरुवात झाली आहे. जर पावसाने उघडीप दिल्यास किंवा ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिल्यास दहा ते पंधरा दिवसांनी फुलांच्या मुख्य बहराला सुरुवात होईल.
गेल्या दोन महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पाऊस आणि दाट धुक्यात कास पठार काहीसे लुप्त झाल्यासारखे वाटत होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कास परिसरात पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने कास पठारचे मनमोहक दृश्य दिसू लागले आहे. पांढऱ्या रंगाच्या चवर या फुलांनी कास पठार बहरले असून, काही ठिकाणी गालिचे पाहायला मिळत आहेत.
गेंद, तेरडा, सीतेची असवे, टुथब्रश, नीलिमा, रानहळद आदी विविध दहा ते पंधरा जाती-प्रजातीच्या रंगीबेरंगी फुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ झाला असल्याने वनसमितीसह पर्यटकांना हंगामाची चाहूल लागली असून, वनसमितीची हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग सुरू झाली असून, वाहनतळ, स्वच्छता, रस्त्यात आलेली झुडपे हटविणे, खड्डे भरणे, हंगामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आदी कामे सुरू असून, उर्वरित नियोजन येत्या दहा-बारा दिवसांत पूर्ण करण्याचे सुरू आहे.
कास पठारावरील फुलांचा हंगाम दि. 3 सप्टेंबरपासून होणार सुरू
सातारा जिल्ह्यातील कास, कोल्हापुरातील मसाई आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात डोंगर, पठार या सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यापैकी जागतिक वारसा स्थळात नोंद असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठारावर दरवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पठारांवर रानफुलांना बहर येतो. निळी, पिवळी, गुलाबी, पांढ-या अशा रंगीबेरंगी फुलांचा जणू सडाच पडतो. यंदा कास पठारावरील हंगाम दि. 3 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. दरम्यान पर्यटक आतापासूनच पठारावर हजेरी लावत आहेत. शनिवारी आणि रविवारी या दोन सुट्टींच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक पठारावर हजेरी लावत आहेत.
1 हजार हेक्टर क्षेत्रात कास पठाराचा विस्तार
सातारा शहरापासून 25 किमी, महाबळेश्वरपासून 37 किमी आणि पाचगणीपासून 50 किमी अंतरावर कास पठार हे अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता लक्षात घेता, UNESCO ने 2012 मध्ये याला जागतिक नैसर्गिक वारसा असलेलं स्थळ म्हणून घोषित केलं आहे. पुण्यापासून सुमारे १४० किमी अंतरावर असलेल्या या पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आकर्षक फुले येतात. या ठिकाणाला तुम्ही फुलांचा गालिचा देखील म्हणू शकता. इथे फुलांच्या आठशेहून अधिक प्रजाती आढळतात. हे पठार तब्बल 1 हजार हेक्टर क्षेत्रात पसरले आहे