सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या फलटण कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ अभियंत्याला २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे नवीन वीज कनेक्शनची प्रकरणे मंजूर करण्यासाठी आपल्याच हाताखालील वरिष्ठ तंत्रज्ञाकडून त्याने लाच घेतली. सदाशिव अशोक गंगावणे (रा. प्लॅट नं ४०१, लोटस रेसोडन्सी, धानोरी रोड, लोहगाव पुणे ४७, वर्ग-३. सध्या रा. गणपती मंदीर शेजारी फलटण) असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विडणी (ता. फलटण) शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
सदाशिव अशोक गंगावणे हे कनिष्ठ अभियंता आहेत. तक्रारदार हे त्याच कार्यालयात अभियंत्याच्या हाताखाली वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे झिरपवाडी व भाडळी बुद्रुक या गावांचा चार्ज आहे. ग्राहकांची नवीन वीज कनेक्शन प्रकरणे मंजूर करून मिटर देण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याने प्रत्येक प्रकरणामागे १ हजार रूपये प्रमाणे तीन प्रकरणाचे ३ हजार रूपये लाच मागितली होती. तडजोडी अंती २ हजार देण्याचे ठरले होते.
यासंदर्भात तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणीमध्ये कनिष्ठ अभियंत्याने लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. त्यानुसार गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कनिष्ठ अभियंत्याला २ हजाराची लाच घेताना पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सचिन राऊत, हवालदार गणेश ताटे, हवालदार नितीन गोगावले, तुषार भोसले, नीलेश राजपुरे, स्नेहल गुरव, शितल सपकाळ, कॉ. निलेश येवले यांनी ही कारवाई केली.