कास पठारावर पर्यटकांसाठी जंगल सफारीसह जीप सफारीची सेवा सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसास्थळ, आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. या ठिकाणी पर्यटकांना कासचे पूर्णपणे दर्शन घेता यावे यासाठी कास पर्यटन स्थळ कार्यकारी समिती व वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी कास पठारावर जंगल सफारी, जीप सफारी, कास पठार परिसर दर्शनासह इतर निसर्ग पॉईंटचे पर्यटन शनिवारपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे आता वर्षभर कास पठार व परिसराचे मनमोहक सौंदर्य पर्यटकांना स्वानुभवता येणार असल्याने पर्यटकांच्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.

निसर्गरम्य परिसर, चोहोबाजुला दाट हिरवीगार झाडी, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पठार, कास धरण पर्यटनस्थळी परिसरात अनेकविध निसर्ग पॉईंट पाहायला मिळणार आहेत. कास पठार निसर्गपथावरून अनेकविध प्रेक्षणीयस्थळे दिसत असून दोन मार्ग करण्यात आले आहेत. मार्ग क्रमांक एकमध्ये वेण्णा व्हयू, उरमोडी सज्जनगड दर्शन, घाटाई देवराई, कास धरण, भदार तळे, मंडप घळ, हंडा घागर पायी ट्रेक असणार आहे. तसेच मार्ग क्रमांक दोनमध्ये शिवकालीन राजमार्ग, कास धरण, कुमुदिनी तलाव, कोयना पॉईट, गाय तळे, लाकडी मनोरा, पवनचक्की प्रकल्प पायी ट्रेक असून कास पठार परिसर दर्शनासाठी जीप सफारी सुरू आहे.

यामध्ये शिवकालीन राजमार्ग, कास धरण, कुमुदिनी तलाव, कास तलाव, कोयना पॉईट, गायतळे, लाकडी मनोरा, पवनचक्की प्रकल्प आदीचे दर्शन घडणार आहे. तसेच पन्नास किलोमीटर परिसराची तीन तास जंगल सफारी दिवसभर सुरू आहे. या पर्यटन पॉईंटमुळे देशविदेशातील पर्यटकांना बारमाही कासचे पर्यटन घडणार आहे. दरम्यान पर्यटकांसमवेत गाईड व कर्मचारी असणार आहेत.

50 किलोमीटरची जंगल सफारी

जर आपल्याला पायी चालत ट्रेक करायचे असेल तर यासाठी दोन मार्ग असून दररोज सकाळी ६ पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ट्रेक सुरू असणार असून प्रतिव्यक्ती ५० रुपये आकारले जाणार आहे. जीप सफारी देखील सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू आहे. प्रतिव्यक्ती १०० रूपये आकारले जाणार असून प्रत्येक फेरीत किमान ८ व्यक्ती या सफारीसाठी असणे आवश्यक आहे. तसेच कास पठारा सभोवती ५० किलोमीटर परिसराची जंगल सफारी देखील दिवसभर सुरू असून एका फेरीसाठी ३ ते ४ पर्यटन करत ४ हजार रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

कास पठाराची वैशिष्ट्ये

1) जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून कास पठाराची संरक्षित यादीत नोंद.

2) मॉन्सून हंगामात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.

3) स्थानिक फुले आणि फुलपाखरांच्या अनेक जातींमुळे हे एक प्रमुख जैवविविधतेचे आकर्षण केंद्र.

4) ‘कासा’च्या झाडावरून ‘कास पठार’ असे नाव दिले…

5) सुमारे 1200 मीटर उंचीवर असलेल्या पठाराला महाराष्ट्राची ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ असेही म्हणतात.