कराड प्रतिनिधी | राष्ट्रीय लोकन्यायालयाचे २८ सप्टेंबरला आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाच्या खटल्यांबाबत कराडमध्ये न्यायालयात नुकतीच बैठक आयोजित केली होती. यावेळी कराड व पाटण तालुक्यांत यापुढे विनावाहन परवाना आणि विमा नसणाऱ्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित विभागांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे वाहतुकीच्या नियमांबाबत कठोर अंमलबजावणी होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी केले.
बैठकीस सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शिरीष पोकळे, शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, परिवहन अधिकारी संदीप बिटले, अपघात क्षेत्रातील विधिज्ञ उपेंद्र पराडकर उपस्थित होते.
न्यायाधीश पतंगे म्हणाले, ‘कराड शहराजवळून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने या ठिकाणी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी नेहमीच छोटे- मोठे अपघात घडत असतात. यामध्ये विनापरवाना वाहन चालवणे किंवा मद्यपान करून वाहन चालवणे ही कारणे असतात.
एका छोट्याशा चुकीमुळे एखाद्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. जर वाहनाचा विमा नसेल, तर त्या कुटुंबास विमा नुकसान वसूल करताना अनंत अडचणी येतात. त्यामुळे वाहन परवाना आणि वाहनाचा विमा या अत्यंत आवश्यक बाबी आहेत.’
परिवहन अधिकारी शिरीष पोकळे म्हणाले, ‘कराड आणि पाटण तालुक्यांत विनापरवाना वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सुदैवाने कऱ्हाड व पाटण तालुक्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय एकच असून, अत्यंत अल्प दरात या ठिकाणी वाहन परवाना कागदपत्रांची पडताळणी आणि चाचण्या घेऊन देण्यात येणार आहे.’