आजच्या पत्रकारितेसमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे आव्हान : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | आज देशातील पत्रकारितेसमोर राजकीय आव्हान उभे राहिले असून निर्भीड पत्रकारितेला मिळणारा वाव कमी झाला आहे. त्याचबरोबर प्रसार माध्यमांची आर्थिक स्वायत्तता व बदलत्या तंत्रज्ञानाचा धोकाही प्रसारमाध्यमांसमोर आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅटजीपीटी, डीपफेक या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेसमोर मोठी आव्हाने उभी राहिली असून पत्रकारांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे तरच त्यांचा नव्या युगामध्ये टिकाव लागेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कराड येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे यांची पुणे विभागीय अधीस्वीकृती समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ‘प्रसार माध्यमे : सद्यस्थिती’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी अध्यक्षस्थानी होते तर कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्राr जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशातील लोकशाही मजबूत करायची असेल तर प्रसारमाध्यमे महत्त्वाची आहेत. शासन व जनतेमधील दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज देशात प्रसारमाध्यमांसमोर दोन आव्हाने आहेत. प्रसारमाध्यमे स्वायत्तपणे, निर्भीडपणे काम करू शकतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात राजकीय संदर्भ, लोकशाही असे पैलू आहेत. जितक्या निर्भीडपणे समाजहिताचे प्रश्न माध्यमे मांडतील, तितकी लोकशाही मजबुत होईल, अशी त्यामागची संकल्पना आहे. दुसरा महत्वाचा विषय वेगाने वाढणाऱया तंत्रज्ञानामुळे पत्रकारांचे काय होणार, हा पैलू महत्वाचा आहे. तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमांची आर्थिक स्वायत्तता यामुळे पत्रकारांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार आहेत.

सुभाषराव जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात ज्ञान आणि विज्ञान अतिशय गतीने पुढे जात असून डिजिटलायजेशनमुळे बँकींग व्यवहार सोपे झाले असले तरी हॅकर्सचे धोकेही आहेत, असे सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले भाषण पत्रकारांसह समाजासाठी उद्बोधक असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. सुभाषराव एरम यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक सचिन शिंदे यांनी केले. प्रमोद सुकरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद तोडकर यांनी आभार मानले.