‘हायवे’सह रस्त्याकडेला भल्या पहाटे जॉगिंग? भरधाव वाहने ठरतायत जीवास धोकादायक

0
320
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । काही जणांना महामार्गावर भल्या पहाटे जॉगिंग करत जाण्याची सवय असते. मात्र, काहीवेळा असे जॉगिंग जीवावर बेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जॉगिंगसाठी किंवा मॉर्निंग वॉक करण्यासाठी जाताना वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यावर गेल्यास अपघात होऊन जीव एकहिल जाण्याच्या घटना घडल्या आहेत. कराड शहर आणि परिसरात पहाटेच्यावेळी अनेकजण रस्त्याकडेला तसेच महामार्गाच्याबाजूने जॉगिंग करत असतात. तर काहीजण सायकलिंग करत महामार्गावरून ये जा करतात. मात्र, पहाटेच्या सुमारास चारचाकी गाडीचालक हे देखील आपली वाहने सुसाट चालवत असल्याने त्यांचे रात्रीभर वाहने चालविल्याने डोळा लागून गाडीचा अपघात देखील होत असतो.

कराड शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि प्रीतिसंगम घाट, आदरणीय पी. डी. पाटील उद्यान अशा ठिकाणी सकाळच्यावेळी नागरिक जॉगिंग तसेच व्यायामासाठी जात असतात. तर सैदापूर, विद्यानगर, बनवडी परिसरात राहणारे नागरिक हे वाय सी कॉलेज, एमजीएम कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या याठिकाणी फिरण्यासाठी जात असतात.

मुख्य रस्त्यावरून पहाटेच्या वेळी धावण्यासाठी किंवा चालण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या ही विद्यानगर परिसरात जास्त आढळते. ज्येष्ठ नागरिक कराड शहरातील उद्यानांमध्ये सकाळी चालताना दिसतात. काही तरुण उद्यानात किंवा अंतर्गत रस्त्यावरून चालत जातात किंवा धावण्यासाठी जातात. मात्र, काही मुख्य रस्त्यावरून पहाटे चालताना किंवा धावताना दिसतात. या रस्त्यावर पहाटेच्या वेळी तशी फारशी वाहनांची वर्दळ नसते. मात्र, काहीवेळा पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक देण्याचा जीवघेणा प्रकार घडू शकतो.

मोठ्या शहरांमध्ये अवजड वाहने किंवा भरधाव वेगाने वाहने अगदी भल्या पहाटेही जात असतात. बरेचदा कानात हेडफोन अडकवून गाणी ऐकत ही मंडळी धावत असतात. त्यामुळे अशा मोठ्या शहरांमध्ये मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंगसाठी जाणाऱ्यांना काही वेळा अशा वाहनांनी धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पोलिस भरतीसाठी सराव करणारेही पहाटेच्या वेळी धावण्याचा सराव वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरून करतात. मात्र, वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असलेल्या अशा रस्त्यांवरून जॉगिंग करताना अपघाताची शक्यता लक्षात घ्यायला हवी.

पहाटे जॉगिंगला गर्दी

पहाटे पाच वाजल्यापासून सात-साडेसात वाजेपर्यंत रस्त्यावर जॉगिंग करणाऱ्यांची किंवा चालण्यासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते.

रस्त्यावर व्यायाम नकोच

सकाळचा व्यायाम मोकळ्या हवेत करण्यासाठी काही जण रस्त्यावरून चालतात किंवा धावतात. मात्र, हे धोकादायक ठरू शकते. त्याऐवजी उद्यानात व्यायाम करणे उत्तम आहे. रस्त्यावर अपघाताचा धोका संभवतो.

पोलिस होण्याचे स्वप्न; युवकांचा कसून सराव

काही तरूण पोलिस होण्याचे स्वप्न बघत असतात. त्यापैकी अनेक जण पहाटेच्या वेळी धावण्याचा कसून सराव करताना दिसतात.

वाहनांचा धोका

पहाटे काळोख असतो. जॉगिंगला काळे कपडे घातलेले असतील तर पाठीमागून किंवा समोरून येणाऱ्या वाहनाला समोरील व्यक्ती न दिसल्याने धडक बसण्याचा धोका असतो.