सातारा प्रतिनिधी | 45 सातारा लोकसभा मतदार संघात निवडणूक पारदर्शक व निर्भयपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाचा भर असून आचारसंहितेचा कोणी भंग किंवा प्रलोभन देत असल्यास त्याची तक्रार नागरिकांनी 1950 या क्रमांकावर किंवा सी व्हीजल ॲपवर तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते. 1950 व सी व्हीजल ॲपवर आलेल्या तक्रारींचा निपटारा प्रशासनाकडून लवकरात लवकर करण्यात येतो, असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी म्हणाले, येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन तयार आहे.
सातारा जिल्ह्यात सेवा बजावणारे मतदार मोठ्या संख्येने आहेत. पोस्टल बॅलेट पेपर पोहचविण्यात आले आहेत. 85 वर्षावरील वृद्ध व दिव्यांग मतदारांना गृह भेटीतून मतदानाचा पर्याय देण्यात आलेला आहे. बऱ्याच मतदारांनी मतदान केंद्रावर जावून मतदान करणे हा आमचा हक्क असून मतदान केंद्रांवर जावून मतदान करणार असल्याचे सांगितले आहे ही एक अभिमानाची बाब आहे.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांना कुटुंबांची जबाबदारी देण्यात येणार आहे. हि सर्व टीम मतदानासाठी पात्र नागरिकांना प्रोत्साहित करतील. 1 पासून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. नवमतदार नोंदणी कार्यक्रमात तरुणांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. हे जास्तीत जास्त मतदार मतदान करतील यासाठी महाविद्यालयांतील प्राचार्यांशी समन्वय ठेवण्यात येत आहे.
45 सातारा लोकसभा मतदार संघासाठी येत्या 7 मे राजी सकाळी 7 ते सायं. 6 या वेळेत मतदान होणार आहे. या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिक, महिला, तरुणांनी पुढे येऊन मोठ्या संख्येने मतदान करुन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी केले.