मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी : जितेंद्र डूडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मतदानाचा दिवशी प्रत्येक कुटुंबातील पात्र नागरिक मतदान करतील यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन 50 ते 60 कुटुंबाच्या मागे शासकीय प्रतिनिधी नियुक्त करावा. मतदानाच्या दिवशी जबाबदारी दिलेल्या प्रत्येक कुटुंबाला भेट देवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात लोकसभा निवडणूक तयारी विषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासह नोडल अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले आहे तथापी यापुढे जावून या टप्प्यात वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहेत असे सांगून श्री. डुडी म्हणाले, ग्रामीण भागात लोकांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करावे या पथकात ग्रामीण भागात काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश असावा.

तसेच शहरी भागात नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग राहील. ही पथके मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी सकाळी 7, दुपारी 12 ते 1 व सायं. 4 वाजता घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबाला भेट देतील व पात्र नागरिकांनी मतदान करावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करतील. मतदानाच्या शेवटच्या 72 तासांत नियमनासाठी असणारी कार्यप्रणाली काटेकोरपणे अंमलात येईल यासाठी दक्षता घ्यावी. पैसे वाटपाबरोबर अवैध बाबी घडू नये यासाठी फिरते व स्थायी पथक अधिक गतीमान करावीत, अशा सूचना डूडी यांनी दिल्या.