सातारा प्रतिनिधी | मतदान करण्यासाठी जाताना आपल्याला आपल्या ओळखीचा एक तरी पुरावा ठेवावा लागतो. मग कुणी मतदान ओळखपत्र ठेवतो तर कुणी आधारकार्ड मात्र, हे दोन्हीही नसतील तर काय करणार? अशात आपल्याला या दोन्ही कागदपत्रांशिवाय मतदान करता येणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर कागदपत्रे सादर करून, मतदान करता येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगीतले आहे.
जिल्हाधिकारी डूडी यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना त्यांची छायाचित्रे असलेली ओळखपत्रे निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटवण्यासाठी ही ओळखपत्रे मतदारांनी सादर करायची आहेत. मात्र, जे मतदार छायाचित्रासह असलेली ओळखपत्रे सादर करू शकत नाहीत, असे मतदार मतदान केंद्रांवर आपली ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर कागदपत्रे सादर करू शकतील.
यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बँक किंवा टपाल कार्यालयाने जारी केलेले छायाचित्रासह असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी करण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तएवेज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम,
पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचार्यांना जारी केलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदारांनी जारी केलेली अधिकृत ओळखपत्रे, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष दिव्यांग प्रमाणपत्र, आदी कागदपत्रांच्या आधारे मतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे.