सातारा प्रतिनिधी । मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारमार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या निमित्ताने उद्या दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविदयालये, सार्वजनिक संस्था तसेच इतर सर्व खासगी संस्थांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी, युवक- युवतींनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घ्यावी, असे महत्वाचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डूडी यांनी केलेल्या आवाहनानुसार पालन करणाऱ्यास नशामुक्त भारत अभियानाच्या वेबसाईटवरून सर्व विद्यार्थी, युवक, युवती, महिला, अधिकारी / कर्मचारी यांना ई-प्रतिज्ञा घेऊन प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. तसेच प्रत्येकाने आपले घर, कार्यालय व लगतचा परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी कटिबध्द राहावे, असे देखील जिल्हाधिकारी डुडी सातारा यांनी सांगितले आहे.
नशा मुक्त भारत अभियान, देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे, ही एक नशामुक्त भारताच्या दिशेने एक व्यापक चळवळ आहे. या मोहिमेद्वारे देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून निरोगी आणि आनंदी समाजाकडे वाटचाल करण्याचे ध्येय आहे.