सातारा प्रतिनिधी । श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून सातारा जिल्हयामध्ये पालखीचे लोणंद, तरडगांव, फलटण व बरड येथे एकूण ५ मुक्काम असणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. 7 जुलै रोजी लोणंद येथे दिवसभर व रात्रीचा मुक्काम असेल तर सोमवार दि. 8 जुलै रोजी सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन दुपारी लोणंद येथून निघून दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल तर मुक्काम तरडगांव येथे होणार आहे. मंगळवार दि. 9 जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून प्रस्थान होईल. सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा, दुपारचा विसावा वडजल व फलटण दूध डेअरी, रात्रीचा मुक्काम फलटण (विमानतळ).
बुधवार दि. 10 जुलै रोजी सकाळी फलटण येथून प्रस्थान, सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, दुपारचा विसावा निंबळक फाटा, रात्रीचा मुक्काम बरड येथे असेल. गुरुवार दि. 11 जुलै रोजी बरड येथून प्रस्थान, सकाळचा विसावा साधबुवाचा ओढ, दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ, दुपारचा विसावा शिंगणापूर फाटा (पानसकर वाडी) येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश व रात्रीचा मुक्काम नातेपुते(जि. सोलापूर).
पालखी सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे पुढीलप्रमाणे कार्यवाही केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन व स्वागत करणे कामी मौजे पाडेगांव येथे जय दुर्गा मंगल कार्यालयाचे समोर स्वागत मंडप उभारण्याचे काम व सातारा जिल्ह्यातील सर्व मान्यवर व प्रशासकीय अधिकारी यांची बसण्याची व्यवस्था करणेची कार्यवाही सुरु आहे.
पालखी विसावा, पालखी तळावरील झाडे झुडपे काढणेबाबत संबंधित यंत्रणांना कार्यवाही सुरु आहे. महसूल विभाग, स्वच्छता विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, आणि गृह विभाग या विभागातील सर्व मिळून एकूण 3 हजार 132 अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.
पालखी विसावा चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडीट पूर्ण
पालखी महामार्गावरील खडडे, साईडपटटया तसेच पालखी तळावर मुरुम/खच टाकून रोलिंग करावयाचे कामकाज सुरु आहे. पालखी विसावा चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडीट तसेच पालखी विसावा व पालखी तळाकडे जाणारे अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवणेचे काम जिल्हा परिषद बांधकाम कडून करणेत आले आहे. शौचालय उभारणी ठिकाण व संख्या तसेच मैला गाळ व्यवस्थापन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
पालखी सोबत फिरते शौचालय
लोणंद – १३ ठिकाणी १८०० फिरते शौचालय, तरडगांव -१७ ठिकाणी १८०० फिरते शौचालय, फलटण- १३ ठिकाणी १८०० फिरते शौचालय, बरड – २१ ठिकाणी १८०० फिरते शौचालय तसेच पालखी महामार्गावर ३७ ठिकाणे निश्चित करुन ७४ तात्पुरती मुतारी उभारणेत आलेल्या आहेत. पालखी मार्गावर १२ ठिकाणे निश्चित करुन २४ बंदीस्त महिला स्नानगृहाची व्यवस्था करणेत आलेली आहे.
१५ तात्पुरते निवारा शेड उभारणी
पालखी महामार्गावरील पाडेगांव, तरडगांव, बरड, विडणी, कापडगांव, कोरेगांव, सुरवडी, राजुरी, निंभोरे, पिंपरद, निंबळक, वडजल, काळज, जाधववाडी (फलटण) आणि कोळकी येथे प्रत्येकी १ या प्रमाणे १५ तात्पुरते निवारा शेड उभारणी करण्यात आली आहे.
४०५ ठिकाणाहून वारीसाठी पाणी पुरवठा करणेत
पाण्याचे स्त्रोत व पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ३२२- विहीरी, ७४- बोअरवेल, ९- सार्वजनिक पाणी टाकी अशा एकूण ४०५ ठिकाणाहून वारीसाठी पाणी पुरवठा करणेत येणार असून ३४५० टँकर भरणेची क्षमता असून २१५ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ६४ वैद्यकीय अधिकारी, ५३६ आरोग्य कर्मचारी
आरोग्य व्यवस्था – आरोग्य व्यवस्थेसाठी ६४ वैद्यकिय अधिकारी, ५३६ आरोग्य कर्मचारी, ३९ रुग्णवाहिका, १७ आरोग्य दूत, १ ग्रामीण रुग्णालय, ३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २१ आपला दवाखाना स्थिर वैदयकिय पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. तसेच पालखी मार्गालगतचे खासगी हॉस्पिटलमध्ये १० टक्के खाटा आरक्षित ठेवणेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही सुरु आहे.
वाहनांची सुरक्षा विषयक तपासणीचे आदेश
आषाढी वारी कालावधीत महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने – हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन सुविधा, निवारा गृहे, पिण्याचे पाण्याची सुविधा, निवास सुविधा, महिला मदत व मार्गदर्शन कक्षाची उभारणी करणेत आलेली आहे. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार, दारु दुकाने बंद ठेवणेचे आदेश काढणेत आलेले आहेत. परिवहन विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सुरक्षा विषयक तपासणीचे आदेश काढणेत आलेले आहेत.
१२००० गॅस सिलेंडर रिफिलची व्यवस्था
खाद्यगृह, खाद्यपदार्थ, शितपेय यांची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी आदेश काढणेत आलेले आहेत. पालखी मार्गावर पालखी मार्गक्रमण कालावधीत ठराविक मार्गावरील वाहतुक बंद ठेवणेबाबत आदेश काढणेत आलेले आहेत. लोणंद मुक्कामी ५ गॅस एजन्सीमार्फत ७ हजार गॅस सिलेंडर रिफिल करण्याची व्यवस्था करणेत आलेली आहे. तरडगांव, फलटण व बरड मुक्कामी १० गॅस एजन्सीमार्फत १२००० गॅस सिलेंडर रिफिल करण्याची व्यवस्था करणेत आलेली आहे. गृह विभागाकडून पालखी कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होउ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त नेमणेत आलेला आहे.