सातारा प्रतिनिधी । सध्या तंबाखू खणाऱ्यासह धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून जनजागृती देखील केली जात आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई देखील केली जात आहे. या अनुषंगाने आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यामध्ये ज्या शाळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असेल अशा ठिकाणी कारवाई करा, तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
सातारा येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. यावेळी बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूच्या दूष्परिणामाबाबत जागृती करावी, गर्दीची ठिकाणे, एसटी स्टँड, बस स्टॉप, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे आदी ठिकाणी व्यसनमुक्तीपेटी ठेवण्यात यावी. त्याचबरोबर शहरी भागासह ग्रामीण भागात भरारी पथकामाच्या माध्यमातून वेळोवेळी दुकानांना भेटी द्याव्यात, वर्कर्ससाठी आरोग्य तपासणी शिबीर राबवावे,अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी केल्या.