सातारा प्रतिनिधी | आदर्श शाळांचे बांधकाम करताना ठरवून दिलेल्या निकषानुसार त्याच दर्जाचे बांधकाम करणे व दर्जेदार साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे असे सांगून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदर्श शाळेतील बांधकामे सद्यस्थितीत कोणत्या स्तरावर आहे, याचा आढावा घेतला. सर्व बांधकाम मे 2024 अखेर पूर्ण करणे बाबत संबंधितांना सूचना दिल्या.
स्वच्छतागृह आणि हॅंडवॉश स्टेशन, संरक्षक भिंत, बाला पेंटिंग, स्वागत कमान, क्रीडांगण विकसन, सोलर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष या सर्व बाबींची पूर्तता गटविकास अधिकाऱ्यांनी विविध विभागातील योजनांचा समन्वय तसेच लोकसहभागातून पूर्ण करून घेणे बाबतही सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पहिल्या टप्यात निवडलेल्या सर्व पन्नास आदर्श जिल्हा परिषद शाळांचा तपशीलवार आढावा घेतला. जिल्हा परिषद, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महादेव घुले यांच्या उपस्थितीत डाएट प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर, सर्व गटविकास अधिकारी, डाएट अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कनिष्ठ अभियंता, विषय तज्ञ यांची आढावा बैठक घेण्यात आली. तसेच या बैठकीस कार्यकारी अभियंता दक्षिण व उत्तर हेही उपस्थित उपस्थित होते.
आदर्श शाळेतील सुविधांसाठी प्रत्येक शाळेत शैक्षणिक मेळावे घेऊन त्यासाठी माजी विद्यार्थी निमंत्रित करावेत तसेच सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी, उद्योगपती यांना लोकसहभागासाठी आवाहन करणे बाबत गटशिक्षणाधिकारी यांनी आवश्यक तो समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषद शाळामध्ये आनंददायी अभ्यासक्रम राबवणे बाबत गटशिक्षणाधिकारी यांनी कार्यवाही करावी तसेच जिल्हा परिषद शाळातील गुणवत्तेसाठी शिक्षण विभाग, डाएट यांनी NASच्या धर्तीवर चाचण्या घेण्याचे नियोजन करावे याबाबत सूचना देण्यात आल्या.
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत परसबागांची निर्मिती करून त्यातील भाजीपाला पोषण आहारात वापरण्यात यावा, प्रत्येक शाळेत स्पोर्टस क्लब स्थापन करावेत अशाही सूचना देण्यात आल्या.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत सर्वच शाळांचे रजिस्ट्रेशन करून घेणे बाबत तसेच स्पर्धेसाठी सर्व शाळांनी आवश्यक तयारी करावी यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना सूचित करून वेळेत कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सन 2024 2025 मध्ये प्रत्येक केंद्रातून एक जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीम. मुजावर यांनी शाळात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
तसेच पार पडलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत राबवण्यात येत असलेल्या एलआयपी प्रोग्रॅम बाबत माहिती दिली. कार्यकारी अभियंता दक्षिण व उत्तर यांचे मार्फत जिल्हा परिषद आदर्श शाळा बांधकामाची माहिती सविस्तरपणे देण्यात आली. उपक्रमशील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले. सन 2024-25 मध्ये केंद्रातून एक याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळेचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न करणेबाबत सूचना दिल्या.