सातारा प्रतिनिधी । विधासनभा निवडणुकीसाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा तसेच त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात. आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणीसंदर्भात नियमांचे काटेकोर पालन करून एखाद्या संशयास्पद व्यवहारांची माहिती तत्काळ प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे महत्वाचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींसोबत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक श्री. डुडी यांनी नुकतीच बैठक घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी राहुल कदम, अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री. डुडी म्हणाले, “निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची माहिती, निवडणूक अधिकारी व खर्च संनियंत्रण पथकाला तत्काळ कळवावी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत अथवा एटीएमध्ये भरणा करण्यासाठी पैशांची वाहतूक करताना निवडणूक आयोगाने इलेक्शन सिजर मॅनेजमेंट सिस्टीम दिलेली आहे. यामध्ये पूर्ण मार्गासह व्यवस्थित माहिती भरावी. वाहतूक करणाऱ्या व हाताळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची ओळखपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. पतसंस्थांनी तहसीलदार व सहायक निबंधक यांची परवानगीने पैशांची वाहतूक करावी. लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीने काम केले आहे, त्याच पद्धतीने विधानसभेच्या वेळी काम करावे.”
समितीची नेमणूक
भरारी पथकाने, स्थिर संनिरीक्षण चमूने व पोलिस विभागाने जप्त केलेल्या रकमांचा परतावा करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, नोडल अधिकारी, खर्च संनियंत्रण समिती तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा कोशागार अधिकारी यांचा समावेश आहे.
असे आहेत नियम
१) उमेदवारी अर्जासाठी लागणाऱ्या परवान्यांसाठी एक खिडकी योजना
२) जिल्ह्यातील ५० टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग
३) उमेदवारांना ४० लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा
४) जप्त केलेल्या रकमांच्या परताव्यासाठी समितीची नेमणूक
गैरप्रकार आढळल्यास १९५० या टोल फ्री क्रमांकावर करा फोन
निवडणुकीत लाच घेणारा व देणारा दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी आणि मतदारांना धमकी देणाऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी भरारी पथके नेमली आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या काळात त्याच्या मतदानाचा हक्क वापरण्याकरिता व्यक्तीला प्रलोभन दाखवण्याच्या कोणत्याही व्यक्तीविरोधात एक वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंडास शिक्षापात्र असणार आहे. अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील सर्व दिवशी २४ तासांत १९५० या टोल फ्री नंबरवर माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डूडी यांनी केले आहे.