सातारा प्रतिनिधी | पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे 3 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम सन 2023-2024 अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, डॉ. सुनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, 3 मार्च रोजी 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने ही मोहिम यशस्वीतेसाठी एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, यात्रा, जत्रा, मंदिर यासह गर्दीच्या ठिकाणी ट्रान्झीट बुथचे आयोजन करावे. तसेच ज्या ठिकाणी तुरळक लहान बालके आढळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी मोबाईल टिमचे आयोजन करावे.
बुथवर न आलेल्या बालकांचा शोध घेऊन लसीकरणासाठी घरभेटीच्या पथकांचे नियोजन करावे. ग्रामीण भागातील 125 तर शहरी भागातील 200 घरांना भेटी द्याव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना या पुर्वी कितीही डोस दिले असल्यास अथवा बाळ आजारी असल्यास तरीही 3 मार्च रोजी नजीकच्या पल्स पोलिओ बुथवर पोलिओची लस पाजण्यासाठी घेवून जावे, असे आवाहनही त्यांनी केले.