नव मतदार नोंदणी, नावे वगळण्याचे काम पाच दिवसात पूर्ण करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मतदार याद्यांची तपासणी व प्रत्येक घराचे सर्वेक्षण करुन मतदानाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा लोकसभा संघांतर्गत नव मतदार नोंदणी, मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याचे काम अभियानस्तरावर हाती घेऊन येत्या पाच दिवसात पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

शाहू कला मंदिर येथे सातारा विधानसभात मतदार संघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीमेचा तसेच आगामी लोकसभा-2024 निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी सतिश बुद्धे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, मतदार नोंदणी व मतदार याद्याच्या दुरुस्तीचे सुमारे 80 टक्के काम झाले आहे. उर्वरीत काम पूर्ण होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामसेवक, कोतवाल, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची बैठक घ्यावी. 18-19 वर्षे वयोगटातील मतदारांची नोंदणी करण्यासाठी 2004 ते 2006 या कालावधीतील जन्मनोंदणीची यादी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून घेऊन मतदार नोंदणी करावी. मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याचे काम प्रधान्याने हाती घ्यावे. ग्रामपंचायतीकडील मृत्यू नोंदवहीनुसार 2019 पासून मृत्यू झालेल्या मतदारांची माहिती घेऊन नावे वगळता येतील.

मतदार नोंदणीच्या अनुषंगाने कुटुंबातील नागरिकांचे अपेक्षित सहकार्य लाभणे आवश्यक असून त्यासाठी तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांनी बीएलओंसह गृह भेटी द्याव्यात. कुटुंबातील मुलांच्या वयाची माहिती घेऊन पात्र मतदारांची जागीच नोंदणी करावी. यापूर्वीच नोंदणी केलेली असल्यास नावे मतदार यादीत समाविष्ठ असल्याबाबत खात्री करावी. मयत मतदारांची आणि स्थलांतरीत मतदारांची वगळणी योग्यप्रकारे करणे आवश्यक आहे. यामुळे मतदार यादीतील अतिरिक्त नावे कमी होऊन मतदानाची टक्केवारीदेखील आपोआप वाढेल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

गृहभेटीदरम्यान बाहेर गावी राहणाऱ्या मतदारांना नोंदणीसाठी स्वत: येण्याची गरज नाही याची कुटुंबातील व्यक्तींना माहिती द्या. ते मोबाईल ॲप डाऊनलोड करुन आवश्यक नमुने, कागदपत्रे अपलोड करुन नाव नोंदणी करु शकतात. 1 ऑक्टोबर 2024 ला 18 वर्ष पूर्ण होणारे युवकही मतदार नोंदणी करु शकतात. फक्त त्यांना मतदानाचा अधिकार वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळेल. अधिकाधिक मतदार नोंदणीच्या अनुषंगाने या माहितीवर भर द्यावा, असे निर्देशही श्री. डुडी यांनी दिले.