सातारा प्रतिनिधी । दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे 16 ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरावर आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या विभागांना जबादारी दिली आहे ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून अभियान यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात 16 ऑक्टोंबर रोजी आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डुडी म्हणाले, दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासनाच्या बऱ्याच योजना आहेत. विभाग प्रमुखांनी त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा त्याचबरोबर 16 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानामध्ये जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांना जागेवरच लाभ देण्याचे नियोजन करावे. या अभियानामध्ये विविध शासकीय विभागांनी आपले स्टॉल उभारुन विविध योजनांची माहिती दिव्यांगांना द्यावी.
सुलभ अंमलबजावणीकरिता आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पार्किंगच्या ठिकाणी जबाबदार अधिकारी यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करुन दिव्यांगांना मदत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात यावे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी. कार्यक्रमस्थी दिव्यांगासाठी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करावे. या अनुषंगाने आरोग्य विभागाने आपली तयारी करावी. शासन आपल्या दारी या धर्तीवरच दिव्यांग कल्याण विभाग दिव्यागांच्या दारी अभियानाचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केल्या.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या नियोजनाची पुर्वतयारी झाली असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी म्हणाले, ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांना आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अभियानात सहभागी होणाऱ्या दिव्यांगासाठी जेवणापासून सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच या अभियानाप्रसंगी विविध शासकीय विभागांचे तसेच जिल्हा परिषदेकडील असणाऱ्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. कुणाला काही अडचणी असल्यास जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही श्री. खिलारी यांनी बैठकीत सांगितले.