साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲक्शन मोडवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर आज पहाटे कारवाई करण्यात आली. यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आले. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला, अशी तीन अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्सा महाबळेश्वर तालुक्यातील वाढत्या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. त्यानुसार महसुल विभाग, पोलीस, ग्रामविकास विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने अत्यंत गुप्तता पाळून पहाटे अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारत मेटगुताड, गुरेघर येथीस अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.

गुरेघर येथील डोंगर कड्यावर नव्याने सुरु असलेले अंदाजे ५ हजार स्वेअर फुटचे बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केलं. पहाटे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टरच्या साह्याने प्रशासनाने ही मोहीम राबवली. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणादणाले आहेत.

महाबळेश्वर येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार रविवारी (दि.१०) पहाटे प्रशासनाने धडक कारवाई करत बांधकामांवर हातोडा मारला. वाईचे प्रांताधिकारी राजेश जाधव, महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील, वाईच्या तहसिलदार सोनाली मेटकरी, खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, पाचगणीचे मंडल अधिकारी चद्रकांत पारवे, महाबळेश्वरचे मंडल अधिकारी खटावकर, आण सर्व तलाठ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.