स्मार्ट प्रा. आ. केंद्र उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 65 केंद्र अद्ययावत करणार – जितेंद्र डूडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 65 प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.

आरोग्य धनसंपदा हे सुंदर सुत्र आपल्या भारतीय संस्कृतीने आपणांस सांगितले आहे. उत्तम आरोग्य हिच खरी संपत्ती तथा सर्व सुखाचे आगर होय, याच सद्विचारास बांधिल राहून दर्जेदार गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा निश्चय जिल्हा प्रशासन आणि सातारा जिल्हा परिषदे मार्फत केला आहे. समाजातील सर्व घटकांना आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा अधिकारी आहे. तो फलद्रुप होण्यासाठी त्यांना गाव व प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हा मुख्य उद्देश आहे.

सातारा जिल्हा हा राज्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणारा व पथदर्शी कार्यक्रम राबविणारा जिल्हा आहे. भविष्यात सुध्दा अशाच प्रकारे जिल्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला उच्च प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविण्याचा मानस ठेवूनच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याच अनुषगांने महाराष्ट्र शासन, सातारा जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हयातील एकूण 65 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात येणार आहे.

सदर उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आलेला होता. तद्नंतर त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र (स्मार्ट पी एच सी) उपक्रमांतर्गत खालील प्रमाणे बदल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

अद्यावत वैद्यकिय साहित्य, प्रा आ केंद्रामधील अंतर बाहय विभाग, प्रसुतीगृह व शस्त्रक्रियागृह हे प्रमुख विभाग असून हे सर्व विभाग अद्ययावत तांत्रिक संसाधनांनी सुसज्य ठेवण्यासाठी अद्ययावत साधन सामुग्री खरेदीबाबत सूचना देण्यात आल्या.आधुनिक तंत्रज्ञान वापर रुग्णांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे, लोकांना स्मार्ट हेल्थ कार्ड उपलब्ध करुन देणे, रुग्णांना त्यांच्या तपासणीचे अहवाल मोबाईलवर उपलब्ध करुन देणे, तसेच रुग्ण पुढील उपचारा करीता इतर शासकीय संस्थेकडे संदर्भीत केल्यास रुग्णांची या पुर्वीचा उपचार इतिहास त्या संस्थेकडे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होणे करीता अद्ययावत संगणकीय प्रणाली विकसित करुन घेण्यात यावी.

मनुष्यबळ व प्रशिक्षण सर्वसमावेशक आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य सेवा देणारे अधिकारी कर्मचारी यांचे विविध प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण गरजेनुसार मार्गदर्शक सुचनांनुसार पूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती प्राप्त होणेसाठी जिल्ह्यातील सर्व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची Uniceff मार्फत पाहणी करणेत आलेली असून त्यांचे अहवालानुसार जिल्हा प्रशिक्षण केंद्रांमार्फत आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी यांचे तांत्रिक व प्रशासकीय कौशल्यावर आधारित प्रशिक्षण आयोजित करणेत येतील

प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम व परिसर सुशोभिकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाह्य परिसरामध्ये प्रामुख्याने सरंक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, हिरकणी कक्ष, प्रसाधन गृह, निवासस्थाने इ. बाबींचा तर अंतर्गत भागामध्ये प्रसुतीगृह, प्रयोगशाळा, औषध भांडार, शस्त्रक्रियागृह व संगणक कक्ष इ. बाबी प्रामुख्याने अद्ययावत करणेबाबत सूचना देणेत आल्या. उपरोक्त सर्व बाबी सुस्थीतीत असणे व आवश्यक्ते नुसार दुरुस्ती करणे, सुशोभिकरण करणे, स्वच्छता, इ. बाबींवर प्रामुख्याने विशेष लक्ष देणेबाबत सूचना देणेत आल्या. प्राआकेंद्रांची स्वतंत्र स्वागत कमान करणे व प्राआकेंद्र दर्शनी भागात आयुष गार्डन साठी CSR मधून निधी उपलब्ध करुन घेणेसाठी प्रयत्न करावेत.