सातारा प्रतिनिधी । आज सातारा लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेवरून शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला. “सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले हे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले. ते दिल्लीत जाऊन ‘तिकीट द्या, तिकीट द्या’, करत होते. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला फारशी आवडणारी नाही”, अशा शब्दात शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली.
जितेंद्र आव्हाड यांनी आज मंगळवारी ठाणे येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आव्हाड म्हणाले की, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा आदर आहे. मग ती छत्रपतींची कोल्हापूरची गादी असो किंवा सातारची गादी असो. छत्रपतींच्या वंशजांनी ही गादी आचारविचाराचे पालन करुन पुढे चालवली पाहिजे. पण उदयनराजे यांची कृत्य, दुष्कृत्य साताऱ्यासह सर्वत्र पाहिलेली आहेत. त्यांचे वागणे गादीचा सन्मान ठेवणारे असते तर ठीक होते. महाराष्ट्राला एक परंपरा आहे.
आजही छत्रपतींच्या गादीला सर्वजण मान देतात, त्या गादीचा मान ठेवायला पाहिजे होता. आपण कोणासमोर झुकत आहोत, याचा विचार उदयनराजे यांनी केला पाहिजे होता. पण ते साताऱ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले होते. दिल्लीच्या तख्तासमोर ते मला तिकीट द्या, तिकीट द्या, असे सांगत होते.
सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही
शशिकांत शिंदे हा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला माणूस आहे. त्यांच्या घरची परिस्थिती काय होती हे राजेंनाही माहिती आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद, हिम्मत, कर्तृत्त्व आहे त्यांना मोठे केले आहे. त्याचा वारसा काय हे त्यांनी कधीच बघितले नाही. शशिकांत शिंदे हा गरीब घरातला माथाडी कामगार आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी राजेंना अंगावर घेतला आहे. त्यामुळे खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे आहेत. शशिकांत शिंदेच जनतेला न्याय देऊ शकतात. सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही, अशी टीका देखील आव्हाड यांनी यावेळी केली.
हा तर सातारच्या गादीचा आणि महाराष्ट्राचा अपमानच…
यावेळी आव्हाड यांनी उदयनराजेंवर निशाण साधला. शाहू महाराजांना जसं घरी बसून तिकीट दिलं, त्यांना कुठे तिकीट द्या, तिकीट द्या, करत फिरावं लागलं नाही. साताऱ्याच्या गादीचा इतिहास फार मोठा आहे. अशाप्रकारे तिकीट मिळवणं म्हणजे त्या गादीचा अपमान आहे. तुम्ही ज्याचा वारसा सांभाळता त्या गादीने एकेकाळी दिल्लीला आव्हान दिलं होते. त्या गादीवर बसलेला वारस हा जर दिल्ली पुढे नतमस्तक होत असेल तो तुमचा नाही, तर उभ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले.