सातारा प्रतिनिधी । गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेकरिता (जिहे- कठापूर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिसऱ्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे खटाव, माण, कोरेगाव आणि सातारा तालुक्यांतील एकूण १७६ गावांमधील ६० हजार ४३७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, तसेच या तालुक्यांना लागलेला दुष्काळी कलंक निश्चितपणे दूर होईल, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेंतर्गत दोन बॅरेजेस, तासगाव, भाडळे, नेर क्र.३ व ४, रणसिंगवाडी, शिरवली, उत्तरमांड पश्चिममांड येथील ८ उपसा सिंचन योजनांचे काम तसेच ऊर्ध्वगामी नलिका रांग क्रमांक ३ व ४ आणि तीन
थेट गुरुत्वीय नलिका यांचे काम होणार आहे. आतापर्यंत जिहे-कठापूर बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे, तसेच पंपगृह क्रमांक १, २ व ३, पारेषण वाहिनी, कोल्हापूर पद्धतीचे ३२ बंधारे, वर्धनगड बोगदा, आंधळी बोगदा, ऊर्ध्वगामी नलिका पहिली रांग आदी कामे पूर्ण झाली आहेत. ऊर्ध्वगामी नलिका दुसऱ्या रांगचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे, तसेच नेर उपसा सिंचन योजना क्र. १ चे काम ३० टक्के, रेर उपसा सिंचन योजना क्रमांक २ चे काम ५५ टक्के आणि आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून, अन्य कामे प्रगतिपथावर आहेत. याकामी राज्य शासनाच्या अंदाजपत्रकात २०२३-२०२४ करिता १५० तर २०२४-२०२५ करिता २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेला सुधारित मान्यता मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाचे खा. उदयदराजे यांनी आभार मानले.