जीएसटी आयुक्ताच्या चौकशीसाठी झाडाणी ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची संपूर्ण ६४० एकर जमीन बळकावणाऱ्या गुजरातमधील अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि नातेवाईकांच्या चौकशीची मागणी करत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे आणि झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत मुदत उपोषण सुरू केले आहे. चंद्रकांत वळवींनी केलेल्या अनधिकृत बांधकामा कारवाई व्हावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.

साताऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सह्याद्री वाचवा ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेतंर्गत दुर्गम भागातील माहितीही मिळवली. त्यामध्ये गुजरातमधील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी झाडाणी गावातील ६४० एकर जमीन ग्रामस्थांची दिशाभूल करुन बळकावल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यासंदर्भातील तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून जीएसटी आयुक्तासह तिघांना नोटीस बजावली होती.

यासंदर्भात आज (मंगळवारी) जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. झाडाणी परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामावर अद्याप कोणतीही कारवाई अजून करण्यात आलेली नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर क्षेत्रातील जंगलतोड, खाणकाम, बांधकाम, खोदकाम रोखणे, गावांचा पुर्नवसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणे, बफर क्षेत्रात १८ नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे, जमीन खरेदी व्यवहारांची चौकशी करणे, कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन देणे, नवजा (ता. पाटण) येथील ओझर्डे धबधब्याचे व्यवस्थापन स्थानिक वन समितीकडे देणे, हिंस्त्र वन्यजीवांच्या हल्ल्यांत जखमी होणाऱ्यांना तात्काळ मदत मिळणे, वासोटा किल्ला, ओझर्डे धबधबा परिसरात प्लास्टिक संकलन केंद्र उभारणे आदींसह जिल्ह्यातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईच्या मागणीचाही हे आंदोलन सुरू केले आहे.

झाडाणी गावातील जमीन बळकावल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करत माहिती अधिकार कार्यकते सुशांत मोरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर झाडानी ग्रामस्थांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिला. तसेच शासनाने त्वरित कारवाई करावी आणि आमच्या जमिनी विक्री करणारे एजंट संजय मोरे, आनंद शेलार यांच्यावर कारवाईची मागणी देखील ग्रामस्थांनी केली.