कराडात सिग्नल चुकवण्याच्या प्रयत्नात जीपची तीन वाहनांना धडक; तिघे जखमी, रिक्षासह दुचाकींचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सिग्नल चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव निघालेल्या जीपने तीन वाहनांना धडक दिली. एका रिक्षाला धडक देत जीपने सिग्नलच्या खांबापर्यंत रिक्षाला रेटले. शहरातील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकात दुपारी हा अपघात झाला. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कृष्णा नाका ते विजय दिवस चौक मार्गावर वेणूताई उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकात सिग्नल यंत्रणा आहे. या चौकात चारही बाजूने चार रस्ते असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. सकाळी साडेअकराच्या सुमारास विजय दिवस चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खांबावरील हिरवा सिग्नल लागला. सिग्नलची वेळ संपल्यानंतरही एक जीप सुसाट निघाली होती.

तोपर्यंत दुसऱ्या खांबावरील हिरवा सिग्नल लागल्याने रिक्षा वळण घेत असताना जीपने रिक्षाला जोरदार धडक दिली. शिवाय दोन दुचाकींनाही धडक दिली. जीपने रिक्षाला दुभाजकासह सिग्नलच्या खांबावर रेटल्याने रिक्षातील एका महिलेसह दोन प्रवासी जखमी झाले. तर जीपची धडक अन्य एका दुचाकीला बसल्याने तो दुचाकीस्वारही जखमी झाला.

अपघातामुळे सिग्नलच्या चौकात प्रचंड गोंधळ उडाला. त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अपघात होताच तातडीने चारही बाजूची वाहने थांबवली. नागरिकांच्या मदतीने त्यांनी जीप मागे घेऊन त्याच्यापुढे दबलेल्या रिक्षातील प्रवाशांना बाजूला केले. दोन पोलिसांनी दुचाकीवरील जखमीला तत्काळ रुग्णालयात पाठवले. तर इतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ढकलत चौकातून बाजूला केली. या अपघाताने काही काळ वाहतूक कोंडी झाली. अपघात विभागाचे धीरज चतुर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे.