सातारा प्रतिनिधी | “परिस्थिती अवघड आहे. संकटाची आहे. आपलीच माणसं फुटल्यामुळं परिस्थिती जास्त गंभीर वाटायला लागली आहे. परंतु, जे गेलेले आहेत ते अडचणीमुळे गेलेले आहेत. त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या. आपण नीट राहुया. महाराष्ट्रातील लोकं फार पोहचलेली आहेत. कधी तुम्हाला आम्हाला पोहचवतील याचा नेम नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील पाटणमध्ये झालेल्या मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आज लोक पक्ष सोडून का जात आहेत, हे लहान मुलालाही कळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाची मतांची बेरीज होत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत. पवार साहेब हो म्हणत नाहीत म्हणून त्यांचा त्रास होत आहे, साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून केंद्रातील सत्ताधाऱ्यांची अडचण होत आहेत, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.
आपल्यापुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपला पक्ष फुटून आपले काही सहकारी सत्तेत सहभागी झाले आहेत. परंतु, महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली संस्कृती आज बिघडलेली आहे. काही लोकांचा सत्तेत जाण्याचा मोह काही कमी होताना दिसत नाही. सत्ता व पैसा याचे एक विचित्र सूत्र आणि नातं महाराष्ट्रात सत्तेत बसणाऱ्या लोकांनी तयार केले असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने केलेल्या गोळीबाराचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, आमदारही व्यवसायिक झालेले आहेत. ते सुद्धा जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. आमदारांच्या जमिनीत जर कोणी दुसरा घुसला तर त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो. महाराष्ट्रातच नाही तर बिहारमध्ये देखील पोलीस स्टेशनमध्ये कधी गोळीबार झाला नसेल. बिहारची सुधारणा झाली, पण आमची अधोगती एवढी झाली आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना राज्य आवरत नाही, अशी परिस्थिती आहे.
लोकसभा आणि विधानसभेला झाडून काम झाले पाहिजे. आपण सर्वांनी सक्षमपणाने पक्षाचे काम सुरू करावे. आपण पाटणमधील सभा ही प्रत्यक्षात श्री रामाच्याच दारात घेतल्यामुळं रामाचा आशिर्वाद घेऊन आपणही कामाला सुरुवात करावी, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.