सातारा प्रतिनिधी | सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जे द्यायचे नाही त्याची घोषणा करायचा प्रकार महायुती सरकारने सुरु केला आहे. या घोषणांसाठी त्यांना आठवड्याला पाच ते सहा हजार कोटी खर्च करायचे आहेत. यातून राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती लक्षात येत आहे. महाराष्ट्र घाण ठेवण्याचा प्रकार सुरु असून त्यांना त्यांची लाडकी खुर्ची महत्वाची आहे. राज्याच्या भवितव्याची कोणतीही काळजी नाही, अशी प्रवृत्ती मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचीच दिसते, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी साताऱ्यात दाखल झाली. यावेळी शाहू कलामंदिरात मेळाव्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुधीर पवार आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेस जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माण तालुक्यातही प्रतिसाद मिळाला आहे. सातारा जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील काही नेते मंडळी आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. वाईचे मदन भोसले यांच्या मात्र, पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. जावळीचे अजित पवार गटाचे अमित कदम यांची आमच्या पक्षातून लढण्याची इच्छा असली तरी त्यांच्याशी माझी भेट झालेली नाही. त्यांनी पक्षांकडे अर्ज केला असेल तर त्यांची मुलाखत होईल.
महायुती सरकारवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, ‘सध्या योजनांच्या घोषणा सुरु असून जे द्यायचे नाही, त्याची घोषणा करायला त्यांना काय बिघडतंय. एका मंत्रीमंडळाच्या बैठकीत 56 विषयांवर निर्णय घेतले जात आहेत. रिझर्व्ह बॅंकेला राज्य सरकारने सव्वा लाख कोटींचे अतिरिक्त कर्ज मागितले आहे. त्यातून त्यांना आठवड्याला पाच हजार हजार कोटी रुपये खर्च करायचे आहेत, यातून राज्याची काय परिस्थिती हे लक्षात येते. एकूणच महाराष्ट्र घाण ठेवण्याचा प्रकार असून त्यांना त्यांची लाडकी खुर्ची महत्वाची आहे. राज्याच्या भवितव्याची त्यांना काळजी नाही, अशी प्रवृत्ती मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचीच दिसते.