सातारा प्रतिनिधी | आज विधानसभेत सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला. गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याच्या झाडानीतील घोटाळ्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आरोग्य विभागाचे धक्कादायक प्रकरण बाहेर काढले. भाजपच्या एका आमदाराने कोरोना महामारीच्या काळामध्ये मृत झालेल्या व्यक्तींना जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींमधून पैसे काढल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
जयंत पाटील यांनी सभागृहात आक्रमक पावित्रा घेत नेमकं काय प्रकरण घडलं आहे? याबाबत सविस्तर मांडणी करीत आरोप केले. यावेळी पाटील म्हणाले की, “कोरोना काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्णांना जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींचा लाभ घेत त्या सवलतीची पैसे खाल्ले आहेत. यात धक्कादायक बाब ही आहे या प्रकरणात मुख्य आरोपी हे आपल्या सभागृहाचे एक सदस्य असून ते सत्तेत महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या व्यक्तींचे निकटवर्तीय मानले जातात.”
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे मायणी येथे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. 2020 मध्ये देशभरात कोरोना रोगाचा संसर्ग व फैलाव झाला होता. कोरोना रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचे आढळून आले.
दरम्यान, याआधी या रुग्णालयाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी करारनामा करताना बोगस डॉक्टर दाखवले. यातील डॉक्टर नमुद काळात सदर रुग्णालयात कार्यरत नव्हते व त्यांनी कोणत्याही रुग्णांवर कोणत्याही प्रकारचे उपचार केलेले नाहीत. रुग्णालयाच्या बॉडीने स्वतःच्या फायद्यासाठी सदर डॉक्टर्स रुग्णालयात उपचारासाठी नसतानाही डॉक्टरांची नावे दाखवली. तसेच सातारा जिल्हा परिषद यांच्याकडे रुग्णालय नुतनीकरणासाठी संस्थेच्या संचालक मंडळाचा कोणताही ठराव न घेता, खोटी कागदपत्रे दाखवून, बोगस डॉक्टर दाखवून 300 बेडचे रुग्णालय नुतनीकरण करून सदर नुतनीकरण प्रमाणपत्र हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी करार करताना जोडून शासनाची व संस्थेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली.
सदर रूग्णालयामध्ये कोरोना काळात उपचारादरम्यान 200 ते 250 रूग्णांचा मृत्यु झाला होता. या मृत रुग्णांना सुमारे 10 दिवस ते 3 महिन्यानंतर जीवंत आहेत, असे दाखवून महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये १० ते 12 दिवस उपचार दिला, असे दाखविले. सदर मृत रूग्णास डिस्चार्ज देताना रूग्ण व्यवस्थित असल्याचे दाखवून मयत झालेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज फॉर्मवरती खोट्या सह्या केल्या आहेत. मयत रुग्ण रुग्णालयात अॅडमिट झाले, मयत रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, शासकीय सवलतींचा लाभ घेतला.
तर इतकेच नव्हे, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या नियमानुसार रूग्णाचे समाधान पत्र घेतले जाते ते देखील भरुन दिले. त्यानंतर राज्य परिवहन नियमानुसार परतीचा प्रवास खर्च पन्नास रूपये याचा देखील लाभ घेतला. रुग्णालयाच्या संस्था चालकांनी नुसतीच मयत रुग्णांचे नावे पैसे उकळून शासनाची फसवणूक केली नाही, तर रुग्णांना मिळणारे प्रवासाचे 50 रुपये देखील सोडले नाहीत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.