हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने राज्यातील राजकारण पुरत ढवळून निघालेलं आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार? कोणाला मिळणार उमेदवारी? याचा निर्णय अजूनही बाकी असताना आज पुण्यात खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सातारा आणि बीडच्या जागा वाटपाबाबत चर्चा पार झाली. आज पार पडलेल्या चर्चेवेळी दोन महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आल्या असून याबाबत लवकरच निर्णय दिला जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता साताऱ्यात कोणाच्या नावाची घोषणा खा. शरद पवार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांच्या नावाला पक्षातीलच काही नेत्यांनी विरोध केल्याची चर्चा असताना शरद पवार मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहतील अशी शक्यता आहे. दोन दिवसांत शरद पवार यांनी जिल्ह्यातील सर्वेचा कल पाहून श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील यांनाच ग्रीन सिग्नल देण्याचा विचार केल्याचे बोलले जात आहे. खासकरून सारंग श्रीनिवास पाटील यांना मतदारांचा आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे चित्र आहे. मागील पाच वर्षांचे काम पाहता पाटील पिता पुत्र मतदारांपर्यंत पोहोचले असून त्यांची कामाची पद्धत अनेकांना आपलीशी करत आहे.
पाटणकर, माने यांच्या उमेदवारीबाबत मतदारांच्यात नाराजी
सातारा जिल्ह्याचा आवाका पाहता आणि त्यांचे मागील पाच वर्षांचे काम पाहता श्रीनिवास पाटील यांना होणार विरोध हा हास्यास्पद असून असे झाले तर आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतल्यासारखे होईल अशी भावना शरद पवार गटाच्या कट्टर कार्यकर्त्यांत आहे. १९९९ असो वा २०१९, जेव्हा कोणी पर्याय नव्हता तेव्हा शरद पवारांनी आपला हुकमी एक्का काढत विरोधकाला चितपट केले आहे. सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सातारा जिल्हा राष्ट्रवादीसाठी सेफ झोन समजला जात आहे. मात्र पक्षाला निवडणुकीत बाजी मारायची असेल तर पक्षांतर्गत विरोध थांबवण्यात शरद पवार भूमिका बजावतील असे जाणकार म्हणत आहेत.
पुण्यात आज खासदार शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर सुरुवातीला बीड लोकसभा मतदार संघाबाबत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. नरेंद्र काळे, संदीप क्षीरसागर हे दोघे उपस्थित होते. यावेळी बीड लोकसभा मतदार संघाच्या बैठकीवेळी तेथील उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची याबाबत खा. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत या ठिकाणी प्रबळ असा उमेदवार निवडून आणण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्वाचे विधान देखील केले. आज पुण्यात झालेल्या बैठकीत सातारची उमेदवारी कोणाला द्यायची? याविषयी चर्चा झाली असून त्याबाबत लवकरच निर्णय दिला जाईल, असे पाटील यांनी म्हंटले.
पुण्यातील बैठकीस साताऱ्यातून कोण कोण होते उपस्थित?
पुण्यात आज दुपारी दीड वाजता खासदार शरद पवार यांनी महत्वाची बैठक घेतले. या बैठकीस सुरुवातीला बीड लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा झाली. या महत्वाच्या चर्चेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. त्यांच्यासह साताऱ्याहून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील आणि खा. श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील हे उपस्थित राहिले होते. सुमारे तासभर पार पडलेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.