सातारा प्रतिनिधी । राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले तरी राज्यातील जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा काही सरकारला सोडवता आलेला नाही. अशात सातारा जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी होत असताना प्रजासत्ताक दिन जवळ आला असून साताऱ्यात यावेळी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन कोणाच्या हस्ते केले जाणार? कुणाच्या गळ्यात पाल्कमंत्रीपदाची माळ पडणार अशी चर्चा सुरु झाली असताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच घेतला जाईल आणि नवीन पालकमंत्र्यांच्या हस्तेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन होईल, असे मंत्री गोरे यांनी म्हटले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरील मानीनी जत्रेतील महिला बचत गट स्टाॅलचे काल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री गोरे म्हणाले की, दुष्काळी पट्ट्याचा वेगळा माणदेश जिल्हा होण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. असा जिल्हा झाल्यास स्वागत करु. तसेच नवीन पालकमंत्र्यांच्या हस्तेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन होईल. ‘लाडकी बहीण’च्या प्रश्नावर त्यांनी ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. पाच वर्षे बंद होणार नाही. बहिणींना जानेवारीचा हप्ता २६ तारखेपूर्वी मिळेल.
माणदेश जिल्हा निर्मिती प्रश्नाबाबत मंत्री गोरे म्हणाले, माणदेश जिल्ह्याचा प्रस्ताव समोर आलेला नाही. दुष्काळी पट्ट्याचा माणदेश जिल्हा व्हावा, अशी काहींच्या कल्पना आहेत. पण, तशी कार्यवाही झालेली नाही. माणदेश जिल्हा झाला तर स्वागत करेन. पण, दुष्काळी भाग एकत्र करुन विकसित जिल्हा होईल असे समजायचे कारण नाही, असेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
खंडाळा तालुक्यातील नायगावात बचत गटांसाठी निवासी प्रशिक्षण…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव या जन्मगावी १२५ कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभे राहणार आहे. तेथे उमेद अंतर्गत गटातील महिलांचे निवासी प्रशिक्षण सुरू होणार आहे, असे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सभेतील मार्गदर्शनावेळी सांगितले.
सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाला?
साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांचा बालेकिल्ला महायुतीने हद्दपार करत ८ विधानसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व मतदारसंघात महायुतीने आपला विजयी झेंडा फडकवला. साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. निवडणुकीत यश मिळवलेल्या आठ पैकी चार आमदारांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. पवारांचा बालेकिल्ला हादरविणाऱ्या या चार शिलेदारांच्या खांद्यावर आता राज्याच्या विविध खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी पडली आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या चर्चा सुरु आहे ती पालकमंत्रीपदाची. होय जिल्ह्याचं पालकमंत्रीपद (Guardian Minister) कुणाला दिलं जाणार हे पाहावं लागणार आहे. अशात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री पदाबाबत केलेल्या विधानानंतर प्रजासत्ताक दिनाच्या अगोदरच पालकमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल हे नक्की.