सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील आंधळी येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य असा सत्कार करण्यात कला. यावेळी मंत्री गोरे यांनी बारामतीबाबत महत्वाचे विधान करत इशारा दिला. “आता माण-खटावच्या मातीचं दु:ख संपतय, हे बघितल्यावर बारामतीकरांच्या छातीत सर्वात पहिल्यांदा कळ आली. मी बारामतीकरांच्या पुढं कधी झुकलो नाही अन् झुकणारही नाही, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना इशारा दिला
या वेळी सोनिया गोरे, माजी आमदार डाॅ. दिलीपराव येळगावकर, डी. एस. काळे, अर्जुन काळे, अरुण गोरे, शिवाजीराव शिंदे, गणेश सत्रे, संजय गांधी, किसन सस्ते, बलवंत पाटील, बाळासाहेब कदम, सिध्दार्थ गुंडगे, हरिभाऊ जगदाळे, विशाल बागल, मिनाक्षी काळे, मनीषा काळे, गुलाब उगलमोगले, सोमनाथ भोसले, प्रा. राजेंद्र जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री गोरे म्हणाले की, विरोधकांच्या षडयंत्रांकडे मी यापूर्वी जास्त मनावर न घेता दुर्लक्ष करायचो. पण आता कार्यक्रम केल्याशिवाय सुटीच नाही, असा निर्णय मी आता घेतला आहे. मी बारामतीच्या (Baramati) पुढं झुकलो असतो, तर माझी आमदारकी सोपी झाली असती. पण, पाण्यापासून माझी जनता वंचित राहिली असती. बारामतीकरांना माझा विरोध नाही, तर माझा विरोध त्यांना आहे, ज्यांनी माझ्या मातीला पाण्यापासून, विकासापासून वंचित ठेवलं.
साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात अस्तित्वच ठेवलं नाही. आता सोलापूर, सांगली नव्हे; तर जळीस्थळी काष्टी पाषाणी त्यांना गोरेच दिसतो आहे. पण, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत माझं कोणी वाकडं करु शकत नाही.
आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकीत माझ्या पाचवीला संघर्ष पुजला आहे. ज्यांच्याकडे संघर्षातून वाट काढायची क्षमता असते, तो पुढे जातो. ती क्षमता घेऊन मी जन्माला आलेलो आहे. हा संघर्ष मी माझ्या मातीच्या सन्मानासाठी केला आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर अस्थिविसर्जनसुद्धा माझ्या विरोधकांनी करू दिलं नाही, लगेच षडयंत्र सुरू झाली. मी आमदार, मंत्री होऊ नये, यासाठी नदीकाठी पूजा करण्यात आल्या. मंत्री झाल्यावरही काहींनी पूजा केल्या. आपल्या मातीतीला मंत्री झाल्यावर आनंद होतो, पण माझ्याबाबत तसं झालं नाही. पण जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले.