सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमानुसार राज्यात २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याला ४५ हजार ४२२ घरकुले मंजूर झालीत. पुढील १०० दिवसांत सर्वच घरकुलांना मान्यता देऊ, अशी महत्वाची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत ग्रामविकास मंत्री गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले आदी उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. तसेच समाजातील सर्वात गरीब आणि भूमिहीन घटकांना स्वत:चे हक्काचे पक्के घर उपलब्ध करुन देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यासाठी राज्याचा ग्रामविकास विभागही अहोरात्र प्रयत्न करतोय. याचाच एक भाग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यात २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट आहे. सातारा जिल्ह्यालाही ४५ हजार ४२२ घरकुलांचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करणार आहोत. लवकरच घरकुलाचा पहिला हप्ताही देण्याचा प्रयत्न आहे.
घरकुलाच्या निधीबाबत मंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री निर्णय घेतील. अर्थसंकल्पात रक्कम वाढेल. याबाबत केंद्र शासनाकडेही मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी घरकुलासाठी जागा नसणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपये खरेदीसाठी दिले जातात. ही रक्कम दोन लाख रुपये करण्याचा निर्णय घेतोय, अशी माहितीही यावेळी मंत्री गोरे यांनी दिली.