आमदार जयाभाऊंनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोरच बोलून दाखविला संकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर) चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी थेट फडणवीस यांच्या समोर एक संकल्प केल्याचे बोलून दाखविले. जोवर माण -खटावच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचणार नाही, तोवर विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका जाहीर यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार राहूल कूल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी फडणवीस म्हणाले की, अनेक दशके जी भूमी थेंबथेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत जलपूजन करण्याची संधी आज आपल्याला मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. या भागात पाणी यावे यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी अथक परिश्रम आणि मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षाला आज चांगले फळ आले आहे. आपण विदर्भातून असल्याने दुष्काळी जनतेला ज्या यातना भोगाव्या लागतात त्याची जाणीव आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातील दुष्काळ संपविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाणी योजना गतीने पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, आजचा दिवस माण, खटावच्या मातीसाठी माता-भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुष्काळी भाग म्हणून लागलेला कलंक पुसण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. सुरुवातीस या योजनेत या भागाचा समावेश नव्हता, तो व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला सुधारित मान्यता दिली. औंधसह वीस गावांना पाण्याचे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झाले पाहिजे, असा आग्रही त्यांनी यावेळी धरला.